मानसी ठरली "ब्ल्यू व्हेल'चा बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या "ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या "ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मानसी अभ्यासात हुशार होती. तिला दहावीत 95 तर बारावीत 75 टक्‍के गुण होते. मात्र, चांगले कॉलेज न मिळाल्यामुळे तिने यावर्षी "ड्रॉप' घेतला होता. ती घरीच राहून अभ्यास करीत होती. तिला मोबाईलचे व्यसन जडले होते. ती सतत मोबाईलवर गेम खेळायची. घराच्या वरच्या माळ्यावर तिची अभ्यासाची खोली होती. या खेळाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ती पोहोचली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ती तणावात होती. शेवटच्या टप्प्यात हरणाऱ्या व्यक्‍तीला "गुलाम' घोषित करून आत्महत्या करावी लागते. मानसीने डाव्या हातावर "कट हिअर टू एझिक्‍ट' असे लिहून आपल्या खोलीत ओढणीने गळफास घेतला. सायंकाळी साडेसात वाजता वडिलांना तिने गळफास घेतल्याचे दिसले. खोलीत कुठलीही सुसाइड नोट सापडली नाही. मानसीने अचानक आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.
वडिलांचे आवाहन
पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल देणे चुकीचे आहे. आपले लाड मुलांच्या जिवावर बेतू शकतात. त्यामुळे पालकांनो "ब्ल्यू व्हेल'पासून सावध राहा. मोबाईलमध्ये जीवघेणे खेळ डाउनलोड केले असतात. पालकांचे लक्ष नसल्यास ते जिवावर बेतू शकतात. पालकांनी मुलांची समजूत घालून अशा प्रकारच्या गेम्सपासून परावृत्त केले पाहिजे, असे आवाहन मानसीचे वडील अशोक जोनवाल यांनी "सकाळ'शी बोलताना केले आहे.

बुलेट होते बर्थडे गिफ्ट
मानसीचे वडील अशोक वायुसेनेतून सार्जंट पदावरून निवृत्त झाले तर आई अन्नपूर्णा देशमुख महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. मानसीचा 13 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यामुळे वडिलांकडे बर्थडे गिफ्ट म्हणून बुलेट बाइकची मागणी केली. एकुलत्या मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी त्यांनी बुलेट बुकही केली होती. मानसी उत्तम गायक आणि गिटार वादक होती. तिला गिटारवर गाणी तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय होती. मात्र, नियतीने तिची बुलेट चालविण्याची हौस पूर्ण करू दिली नाही.

 

Web Title: suicide for blue valley game