पुसला येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

वरुड (जि. अमरावती) : आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात अपुरा पाऊस अशातच पीक करपण्याची भीती, सततची नापिकी, अशा विदारक परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 23) पुसला येथे घडली. प्रदीप नामदेव चिमोटे (वय 46), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

चिमोटे यांच्याकडे 6 एकर शेती आहे. त्यांनी जोडधंदा म्हणून ट्रॅक्‍टर घेतला होता. परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने नापिकीचे संकट ओढवले. ट्रॅक्‍टरलाही काम लागत नसल्याने बॅंक कर्जाचे हप्ते भरणे अशक्‍य झाले. शिवाय शासनाकडून ट्रॅक्‍टरसाठी मिळणारे अनुदानही त्यांना मिळाले नसल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. शिवाय यावर्षी पेरणी केली, मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. आता बॅंकेचे कर्ज कसे फेडावे व दुबार पेरणी कशी करावी, या चिंतेत त्यांनी मंगळवारी (ता. 23) रात्रीच्या सुमारास मिरचीवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी चिमोटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी मर्ग दाखल केला. चिमोटे यांच्या मागे वैष्णवी, वेदांती व वैदेही या तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a debt-ridden farmer in Pusla