आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; मृत परिचारिकेच्या वडिलांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र, दोषींवर गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळे मला कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मिळाली, असे गृहीत धरून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले जाईल, आमच्या मृत्युस मुख्यमंत्री व संबधितांना जबाबदार धरावे, असे राज्यपाल व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

एटापल्ली : रंजना तुळशीराम वेलादी या परिचारिकेने दीड महिन्यांपूर्वी क्लोरोक्विन नामक औषधी गोळ्याचे अतिसेवन करुन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दोषी धरून गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा मला कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मृत परिचारिकेचे वडील तुळशीराम वेलादी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर यांना निवेदनातून केली. 

निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र, दोषींवर गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळे मला कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मिळाली, असे गृहीत धरून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले जाईल, आमच्या मृत्युस मुख्यमंत्री व संबधितांना जबाबदार धरावे, असे राज्यपाल व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

रंजना वेलादीची आत्महत्या नसून, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे अत्याचारातून झालेली हत्या आहे, असा आरोप वडील तुळशीराम यांनी केला आहे. मुलगी पल्स पोलिओ मोहीमेदरम्यान एकनसूर या गावी अंगणवाडी केंद्राच्या इमारतीत ड्यूटीवर असताना दुपारच्या दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी त्याठिकाणी शासकीय वाहनाने पोहचले. त्यावेळी तिथे रंजना ही एकटीच होती. गाव लहान असल्याने पोलिओ डोस घेणारे बालके सकाळीदरम्यान पूर्ण संपुष्टात आली. गावातील नागरिक शेतशिवारात कामाला गेले. गाव सामसूम असल्याचा फायदा घेऊन त्या अधिकाऱ्यांना माझे मुलीवर अतिप्रसंग करीत असताना डाटा ऑपरेटर प्रमोद कोहाडकर व हेमंत चामलवार हे शासकीय दौरा बूथ निधीची रक्कम वितरण करण्यास पोहचले. त्यावेळी माझे मुलीचा किंकळीचा आवाज ऐकून त्यांनी बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करुन माझे मुलीस त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. 

मात्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्याने या तिघांनाही नोकारीतून काढण्याची धमकी दिल्याने नोकरी जाण्याच्या भीतीने पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती आणि 4 फेब्रुवारी रोजी रंजनाने औषधी गोळ्याचे अतिसेवन करुन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी असे दोन्ही पदे जिल्हा आरोग्य विभागाने काढून घेऊन प्रशासकीय कार्यवाही केली. त्या दिवसापासून तो एटापल्लीमधून फरार आहे.

मात्र, घटनेला दीड महिन्याचा कालावधी होऊनही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्युला जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन कार्यवाही करावी. अन्यथा मला कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळाली असे गृहीत आत्महत्या करणार असे तुळशीराम वेलादी यांनी राज्यपाल विद्यासागर राव व न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: To suicide Employee Officials registered FIR on them Suspects fathers Demand