‘सैराट’ प्रेमाचा करुण अंत

‘सैराट’ प्रेमाचा करुण अंत

नागपूर - कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारून प्रेमबंधनात असलेल्या प्रेमीयुगुलांना अखेर जीवनयात्रा संपवून प्रेम सिद्ध करावे लागले. विद्यार्थी दशेत असलेल्या युवक आणि युवतीने आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्वर आणि नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्वेता यादव (१७, रा. अयोध्यानगर) आणि अभिषेक सोनकुसरे (२०, रा. एलआयजी कॉलनी, नंदनवन) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्‍वेता आणि अभिषेक दोघेही प्रियदर्शिनी तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकत होते. श्वेता आई व भावासह राहायची. आई घरकाम करीत असून भाऊ सीताबर्डीतील एका दुकानात कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. रविवारी सकाळी आई व भाऊ घराबाहेर गेले असता ती एकटीच होती. त्यादरम्यान तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आई परतली असता ती गळफास घेतलेली दिसली. पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच दुसरीकडे राहणारा अभिषेक याने रविवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ च्या सुमारास आपल्या घरी सिलिंग फॅनला दुपट्टयाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील सहकारी बॅंकेत काम करतात. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचेही एकमेकावर प्रेम होते. प्रेमसंबंधानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे ते तणावात होते. रविवारी त्यांनी काही तासांच्या अंतरांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी ते एकमेकांशी बोलले असण्याची शक्‍यता असून पोलीस त्यांचे मोबाईल जप्त करून पुढील तपास करणार असल्याचे सांगितले. नंदनवनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डी. ओ. पेंडकर हे तपास करीत आहेत. 

दहा दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार 
दहा दिवसांपूर्वी श्वेता ही प्रियकरासह हुडकेश्वर परिसरातील एका उद्यानात पोलिसांना भेटली होती. त्यावेळी हुडकेश्वर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन घरापर्यंत सोडून दिले होते. तिच्या आईला सर्व हकिगत सांगितली. तिच्या आई संबंधित मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून श्वेताचा मोबाईल हिसकावला व महाविद्यालयात जाण्यासही निर्बंध घातले. तेव्हापासून दोघे तणावात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com