'शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आत्महत्या थांबतील'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - पाणी, जमिनीची तपासणी करून शेतीत वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीतील उत्पादन वाढले. शेतीसोबतच दुधाचा जोडधंदा केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 

नागपूर - पाणी, जमिनीची तपासणी करून शेतीत वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीतील उत्पादन वाढले. शेतीसोबतच दुधाचा जोडधंदा केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या शेतकरी अभिमुख कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे संचालक रविंद्र ठाकरे, कार्यकारी संचालक वाय. वाय. पाटील उपस्थित होते. गडकरी म्हणाले, विदर्भात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन सेंद्रिय कार्बन कमी होत आहे. कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता व उपजाऊपणा वाढविण्यास मदत होईल. जमिनीचा कस हा शेतीसाठी उपयुक्त असतो. पाण्यामध्ये असणारे क्षार व तसेच मानवी व पशूच्या शरीरास घातक रासायनिक द्रव्य नष्ट करून पाण्याचा वापर केला तर तो शेती व जनावरास फायदेशीर ठरतो. शेतकऱ्यांनी पाण्याची नियमित चाचणी करावी. 

जास्तीत जास्त पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र शासनाने 15 हजार कोटी रुपये मंजूर करून 108 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विदर्भातील 83 प्रकल्पांचा समावेश असून 26 मोठे सिंचन प्रकल्पदेखील सुरू करण्यात येणार आहे. विदर्भ-मराठवाड्यात सध्या दोन लाख 10 हजार लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. त्यात अजून दहा पट वाढ अपेक्षित आहे. शेतकरी दुधाचे उत्पादन वाढविण्यावर भर देत असताना मदर डेअरीने त्याचे मार्केटिंग करावे. सोबतच दुधावर आधारित उत्पादनाची निर्मिती करावी. विदर्भ- मराठवाड्यात उत्पादित झालेले प्रॉडक्‍ट देशातच नव्हे तर विदेशातही जावेत असे गडकरी म्हणाले. 

पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याची प्लॅस्टिकच्या साहाय्याने साठवण करणे, प्रोटीनयुक्त चाऱ्याकरिता मका, धान, जवस, सरकी, सोयाबीनची ढेप यासारख्या शेतीतील उत्पादनाचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना त्यांनी दिला. शिवाय येणाऱ्या काळात मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाळू जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. प्रस्तावना अध्यक्ष दिलीप रथ यांनी केली. संचालन शिल्पा बेहरे हीने केले. 

शेतकऱ्यांना कानपिचक्‍या 
शेतकऱ्यांनी दुधात युरिया अथवा पाणी टाकण्याची हुशारी करू नये. प्रामाणिकपणे दुधाचा व्यवसाय करावा. आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल, असा टोला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना हाणला. 

Web Title: Suicide will stop if farmers are economically capable