आशीष जयस्वाल यांना खुणावतंय मंत्रीपद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

- म्हणाले, "लवकरच माझा मंत्री बनण्याचा योग' 
- काचुरवाही येथे कुस्त्यांच्या दंगलीत व्यक्त केली इच्छा 
- युतीमध्ये भाजप-शिवसेनेचा सत्तेसाठी सारिपाट व रडीचा डाव सुरू 
- निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबत असल्याचे केले जाहीर 
- मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही मिळाली होती खनिकर्म महामंडळाची जबाबदारी 

रामटेक/काचुरवाही (जि. नागपूर) : राज्यात युतीमध्ये भाजप-शिवसेनेचा सत्तेसाठी सारिपाट व रडीचा डाव सुरू असतानाच रामटेकचे नवनिर्वाचित आमदार आशीष जयस्वाल यांनी "मला सात-आठ दिवसांमध्ये तुमच्या आशीर्वादाने मंत्री बनण्याचा योग येऊ शकतो, असे भाकीत केले. 
काचुरवाही या त्यांच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती दंगलीचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. रामटेकमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून विजयाची हॅटट्रिक नोंदवणारे जयस्वाल बंडखोरी करून निवडून आले. आता त्यांना मंत्रिपद खुणावू लागले असल्याची चर्चा या त्यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. युतीच्या परंपरेत रामटेकची जागा शिवसेनेसाठी भाजपने सोडली नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली व भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला. सत्तेची चाबी शिवसेनेच्या हातात असल्यानेच त्यांना मंत्रिपदाची आशा असावी असेही बोलले जात आहे. त्यापूर्वी निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून ते शिवसेनेसोबत असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना खनिकर्म महामंडळाची जबाबदारी मिळाली होती, हे विशेष. 
काचुरवाही येथे परंपरेनुसार "भाऊबिजे'च्या दिवशी जय बजरंग व्यायाम शाळेच्यावतीने "आमदंगली'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी जि. प. सदस्य नरेश धोपटे, देवराव धुर्वे, शुभम कामळे, गणेश गोल्हर, गणेश कोहळे, सरपंच शैलेश राऊत, लक्ष्मण बावनकुळे, सुदाम धुर्वे, नरेश नाटकर, दृष्यंत बावनकुळे, सुनील कोल्हे, प्रकाश कावळे, नंदू नाटकर, नरेश नाटकर, मारोती मोहनकार, केशव मोरे, गंगाधर चवले, भारत देशमुख, रवी मोहनकार व समस्त गावकरी व पाहुणे मंडळी उपस्थित होते. जंगी कुस्त्यांचा सामन्यानंतर नाटक, मंडईनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. काचुरवाही येथील दिवाळीच्या आमदंगलीसह तमाशा व मंडईला तालुक्‍यात विशेष महत्त्व आहे. 
मी कोणत्याही पक्षाचा नसून "तुमचा' आमदार
उद्‌घाटनासाठी आलेल्या जयस्वाल यांनी त्यांच्या गावातील लोकांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गावातील आखाड्याला, पहेलवानांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे माझे पहिले कर्तव्य आहे. माझ्या गावातील खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे, असे माझे स्वप्न आहे, मी आमदार कोणत्याही पक्षाचा नसून "तुमचा' आहे, असेही आशीष जयस्वाल म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sum of becoming my minister soon