सुमित ठाकूरला शहरात प्रवेशबंदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

नागपूर - प्रा. मल्हारी मस्के यांना शिवीगाळ करून त्यांच्या गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या सुमित ठाकूरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त मंजूर केला. मात्र, त्याला शहरात प्रवेशबंदी करण्यात आली. 

नागपूर - प्रा. मल्हारी मस्के यांना शिवीगाळ करून त्यांच्या गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या सुमित ठाकूरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त मंजूर केला. मात्र, त्याला शहरात प्रवेशबंदी करण्यात आली. 

फ्रेण्ड्‌स कॉलनी परिसरातील प्रा. मस्के यांच्याशी 16 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या वादातून सुमितच्या सहकाऱ्यांनी मस्के यांचे वाहन जाळले व दोन वाहने फोडली होती. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत आहे. प्रा. मस्के यांच्या गाडीची सुमितच्या गाडीला धडक लागली होती. त्यातून हा वाद उद्‌भवला होता. या वेळी सुमित आणि त्याच्या साथीदारांनी मस्के यांची कार फोडली होती. तसेच त्यांच्या घरातील स्प्लेंडर दुचाकीसुद्धा फोडली होती. मस्के यांना धमक्‍या दिल्या तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून मस्के यांना पोलिस संरक्षण दिले होते. या प्रकारानंतर सुमित आणि त्याचा भाऊ अमित ठाकूर पसार झाले. त्यांचे वडील राजकुमार ठाकूर यांना मात्र गिट्टीखदान पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. 

पुढे सुमितला धामणगाव येथून अटक करण्यात आली. सुमित आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुमित आणि त्याचे दोन साथीदार योगेश सिंग व अमित ठाकूर यांचा जामीन अर्ज मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सलमान आझमी यांनी फेटाळला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यापैकी अमित ठाकूर आणि योगेश सिंग यांना 30 नोव्हेंबर 2016 रोजी जामीन मिळाला आहे. प्रथमदर्शनी ठाकूर याने केलेला गुन्हा मोक्कांतर्गत मोडत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि सशर्त जामीन मंजूर केला. तसेच जेव्हा जेव्हा पोलिस बोलावतील, तेव्हा तेव्हा त्याला शहरात प्रवेश करता येणार आहे. सुमित ठाकूरतर्फे ऍड. चेतन ठाकूर यांनी बाजू मांडली.

Web Title: Sumit Thakur ban to the city