महापालिकेने सोडले ‘उन्हावर’ !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - ऊन वाढले काय किंवा अतिवृष्टी झाली काय, नागपूर महानगरपालिका  बैठकांमध्ये अव्वल आणि अंमलबजावणीत शून्य असते. मे महिन्यातील कडाक्‍याच्या उन्हात नागपूरकर होरपळले जात असताना केवळ बैठकांची मालिका सुरू आहे. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे करण्यात येत आहेत. ‘हीट’ वाढली तरी महानगरपालिकेची ‘ॲक्‍शन’ मात्र शून्य आहे. एरव्ही वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रशासनाने  नागपूरकरांना ‘उन्हावर’ सोडले आहे. 

नागपूर - ऊन वाढले काय किंवा अतिवृष्टी झाली काय, नागपूर महानगरपालिका  बैठकांमध्ये अव्वल आणि अंमलबजावणीत शून्य असते. मे महिन्यातील कडाक्‍याच्या उन्हात नागपूरकर होरपळले जात असताना केवळ बैठकांची मालिका सुरू आहे. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे करण्यात येत आहेत. ‘हीट’ वाढली तरी महानगरपालिकेची ‘ॲक्‍शन’ मात्र शून्य आहे. एरव्ही वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रशासनाने  नागपूरकरांना ‘उन्हावर’ सोडले आहे. 

ऊन वाढल्यावर नियोजन करायचे, ही महापालिकेची नेहमीचीच सवय आहे. यंदाही केवळ बैठकाच झाल्या आहेत. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत नागपुरात ठिकाठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाणपोई सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. कुठलीही स्वयंसेवी संस्था पाणपोई लावण्यासाठी महानगरपालिकेच्या परवानगीची वाट बघत नाही. 

मात्र, जनतेच्या पुढाकाराचे क्रेडिट घेण्याचीही संधी प्रशासनाने सोडली नाही. नागपूर शहरातील उद्याने दुपारच्या वेळी सुरू ठेवण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पण, प्रत्यक्षात नागपूरकर साक्षीदार आहेत. एक-दोन अपवाद वगळता कुठलेही उद्यान दुपारी सुरू नाही. त्यामुळे सावलीचे हक्काचे ठिकाणही महापालिकेने हिरावून घेतले आहे. विविध भागांमधील समाज भवन विसाव्यासाठी खुले केल्याची चुकीची माहितीसुद्धा या बैठकीत देण्यात आली. ‘आला उन्हाळा आरोग्य सांभाळा’ यासारखे पारंपरिक सल्ले देण्याच्या पलीकडे कुठलीही जनजागृती महानगरपालिकेने केलेली नाही. जनजागृतीसाठी कुठल्या भागात बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स लावले आहेत, हे महानगरपालिकाच जाणो.

हवामान खात्याच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
दुपारच्या कडक उन्हात ट्रॅफिक सिग्नल्सवर उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये म्हणून शहरातील मोठ्या चौकांमधील सिग्नल्स बंद ठेवण्याचा सल्ला हवामान खात्याने महानगरपालिकेला दिला होता. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या बैठकीत दिलेल्या सुचनेवर महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असून दीड-दोन मनिटांच्या सिग्नल्सवर ४४ डिग्री तापमानाचा फटका नागपूरकरांना सहन करावा लागत आहे. एक मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळाचे सिग्नल्स असलेले फार तर पंधरा-वीस मोठे चौक शहरात आहेत. तापमान जास्त असल्यामुळे दुपारी रस्त्यांवर तशीही वर्दळ कमी असते. त्यामुळे दुपारी बारा ते चार या कालावधीत मोठे सिग्नल्स बंद ठेवले तर उन्हात उभे राहण्याची वेळ येणार नाही, असा उद्देश त्या मागे होता. मुख्य म्हणजे विदर्भ टॅक्‍स पेअर संघटना दरवर्षी यासंदर्भात महानगरपालिकेला निवेदन देत असते. मात्र, महापालिकेने आजवर कधीच गांभीर्याने विचार केला नाही.

‘ग्रीन नेट’चे काय झाले?
सिग्नल्सवर ग्रीन नेट लावता येतील, असा विचार दोन वर्षांपूर्वी पुढे आला होता. मात्र, त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आंध्र प्रदेशातील कुरनुल शहरात या वर्षी हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविण्यात आला. ग्रीन नेट लावले तर सिग्नल बंद ठेवण्याची गरज नाही आणि वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनाही सावली शोधण्याची आवश्‍यकता नाही. 

विकेण्ड होणार ‘हॉट’
या आठवड्याच्या अखेरीस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात ११ व १२ मे रोजी (शनिवार व रविवार) ४५ ते ४७ डिग्रीपर्यंत तापमानाची मजल जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

मेट्रोचे काम दुपारी बंद
वाढते तापमान आणि दुष्परिणाम लक्षात घेऊन महामेट्रो प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना भरदुपारी कामगारांकडून काम करून घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.  मे व जून  महिन्यांसाठी हे नियोजन आहे. कामगारांची सोय बघता हा निर्णय घेतला असला तरीही यामुळे मेट्रोच्या कामावर फरक पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. कामाच्या वेळापत्रकात बदल करून काम सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत निर्धारित कार्य पूर्ण केले जाईल. मेट्रोच्या कामांच्या ठिकाणी देखील कर्मचाऱ्यांसाठी शेड लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, असे कळविण्यात आले आहे.

उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. महानगरपालिका जनजागृती करीत आहे. नागरिकांनीही दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, थंड ठिकाणी काम करावे. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी आणि उन्हापासून बचाव करावा.
- नंदा जिचकार, महापौर

सरासरीपेक्षा जास्त तापमान असताना भरउन्हात दीड ते दोन मिनिटे उभे राहणे आरोग्यासाठी धोक्‍याचे आहे. काही लोक सिग्नल्सवर झाडांची सावली शोधण्याचा प्रयत्न करतात. पण, झाडांचीही संख्या कमी झाली आहे. अशात दुपारच्या वेळी मोठे सिग्नल्स बंदच ठेवले तर नागरिकांची सोय होऊ शकते.
- अविनाश ताठे, निर्देशक, प्रादेशिक हवामान केंद्र

Web Title: summer temperature heat municipal work