रविवार ठरला घातवार; अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी दाम्पत्यासह चार ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नाजूकराव उदेभान तायडे व पत्नी शालिनी नाजूकराव तायडे आजारी नातेवाइकाच्या भेटीकरिता तायडे दाम्पत्य एमएच 27 एएस 6530 क्रमांकाच्या दुचाकीने कठोरा येथून निंभी गावाला जात होते.

अमरावती : जिल्ह्यात रविवारी (ता. तीन) विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एका दाम्पत्यासह चार जणांचा मृत्यू झाला. या घटना जिल्ह्यातील लेहगाव, सुकळी आणि धारणी परिसरात घडल्या. 

दाम्पत्याचा मृत्यू

लेहगाव ते अमरावती मार्गावर लेहगावपासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर दोन कारच्या मध्ये दुचाकी सापडली. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. नाजूकराव उदेभान तायडे (वय 45, रा. कठोरा बुद्रूक) व पत्नी शालिनी नाजूकराव तायडे (वय 40) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आजारी नातेवाइकाच्या भेटीकरिता तायडे दाम्पत्य एमएच 27 एएस 6530 क्रमांकाच्या दुचाकीने कठोरा येथून निंभी गावाला जात होते. घटनेच्या वेळी एमएच 27 बीई 0084 क्रमांकाची कार दुचाकीच्या पुढे तर एमएच 31 सीपी 9220 क्रमांकाची कार तायडे यांच्या दुचाकीच्या मागून येत होती. मागे असलेल्या धावत्या कारचे चाक निखळले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार समोर असलेल्या तायडे यांच्या दुचाकीवर आदळली. अचानक घडलेल्या घटनेमुळे दुचाकीस्वाराला काही सुचले नाही. त्यामुळे धडक बसताच त्यांची दुचाकी समोर असलेल्या दुसऱ्या कारवर धडकली. त्यात नाजूकराव तायडे यांच्या पायाचा अर्धा भाग कटून बाजूला पडला. रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी शालिनी यासुद्धा गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचीही प्राणज्योत मालवली. 

ट्रॅक्‍टरखाली चिरडून मजूर ठार 
सोयाबीन काढण्यासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून खाली कोसळून चाकाखाली चिरडला गेल्याने रोहित धनराज वानखडे (वय 22, रा. सुकळी) या मजुराचा मृत्यू झाला. 
सुकळी मार्गावरील एका शेताजवळ ही घटना घडली. परिसरातील एका शेतात सोयाबीन काढण्याकरिता चार मजूर ट्रॅक्‍टरमध्ये बसून गेले होते. काम आटोपल्यानंतर हे मजूर त्याच ट्रॅक्‍टरमध्ये बसून गावाकडे येण्यास निघाले. दरम्यान, रोहितचा तोल गेल्यामुळे तो ट्रॅक्‍टरमधून खाली कोसळला. ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 
धारणी : येथून 10 किलोमीटर अंतरावरील धूळघाट मार्गावर कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जगत सामप्रसाद जांभेकर (वय 28), असे मृताचे नाव आहे. भुलोरी येथून जगत जांभेकर हे दुचाकीने जात असताना एमएच 27-बिक्‍यू 6529 क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कारचालकाचा शोध सुरू आहे. -  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday was the deadliest; Four killed in Amravati district