सूर्यकिरण, सारंग आणि सुखोईच्या कसरतींनी आकाश दणाणले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेली ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या भात्यातील महत्त्वाचे शस्त्र आहे. शांतता काळ, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही हवाई यंत्रे मदत आणि बचावकार्यात अग्रेसर असतात.

नागपूर ः जगात पहिल्या पाच देशांच्या पंक्तीत असलेल्या भारतीय हवाईदलाची शक्ती नागपूरकरांनी रविवारी अनुभवली. सुखोई विमान, एमआय-30 या लढाऊ या हेलिकॉप्टर्सनी केलेल्या हवाई कसरतींनी आकाश दणाणले. सूर्यकिरण विमानांनी विविधांगी कसरती करीत प्रेक्षकांना श्‍वास रोखून धरायला लावले.

भारतीय हवाईदलाच्या मेंटनन्स कमांडची स्थापना 26 जानेवारी 1955 रोजी झाली. या घटनेला 65 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त हवाई कसरती करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूमंत्री नितीन गडकरी, नागपूर मेंटनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल आर. के. एस. शेरा यांच्यासह तिन्ही दलांतील आजी-माजी अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सकाळी 10 वाजताच्या सुमारास "एअर शो'ला प्रारंभ झाला. सैनिकांची वाहतूक, रसद पुरवठा करण्याबरोबरच अवकाशात थेट शत्रूला भिडण्याची क्षमता असलेली एम-आय 17 ही शक्तिशाली हेलिकॉप्टर्स अवतरताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेली ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या भात्यातील महत्त्वाचे शस्त्र आहे. शांतता काळ, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही हवाई यंत्रे मदत आणि बचावकार्यात अग्रेसर असतात. त्यापाठोपाठ दृष्टिपथास आले ते विशाल असे अवरो हे वाहतूक विमान. अत्यंत कमी उंचीवरून या "फ्लाय पास' केला. सीमांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांसाठी मनुष्यबळ, रसद आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याची जबाबदारी या विमानांची असते.

...सूर्यकिरण विमानांनी जिंकली उपस्थितांची मने...
हवाई कसरती म्हटल्या की डोळ्यासमोर येतात ती सूर्यकिरण विमाने. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. आजच्या कसरतीत चारही दिशांनी चित्तथरारक कवायती सूर्यकिरणच्या वैमानिकांनी केल्या. वज्र, वाइन ग्लास, क्रॉस बो, अंतरिक्ष आदी कसरतींच्या प्रकारांचे (फॉर्मेशन) प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने जिंकली. सर्वाधिक काळ कसरती करण्याचा मानही या विमानानी पटकावला. फ्लाइट लेफ्टनंट अंजली रॉय यांनी सूर्यकिरणच्या कामगिरीचे संचलन केले.

...सुखोईची डॉगफाइट...
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एफ-16 या अमेरिकेने पुरविलेल्या लढाऊ विमानांनी भारतीय ठाण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय वैमानिकांनी थेट समोरासमोरच्या लढाईत उडी घेतली होती. त्यापासूनच प्रेरणा घेत आज एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सुखोई या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींची डॉगफाइट घडवून आणली.
आग्रा येथील आकाशगंगा पॅराट्रुपर्सच्या पथकानेही जोरदार प्रात्यक्षिके केली. 10 हवाई योद्‌ध्यांचा समावेश असलेल्या या पथकातील सदस्यांनी 8 हजार फूट उंचीवरून उडी घेत आपले युद्धकौशल्य, अचूकता आणि वीरतेचे दर्शन घडविले. तसेच हवाईदलाच्या गरुड या कमांडोजच्या पथकाने युद्धपरिस्थितीत केल्या जाणारे आक्रमण, मदत आणि बचाव कार्याचे कौशल्य दाखविले. भारतीय बनावटीच्या सारंग या हेलिकॉप्टर्सनी अत्यंत कमी उंचीवरून भराऱ्या घेत आपल्या अचूकतेचे दर्शन घडविले. सारंग पथकाच्या हवाई कसरतींचे संचलन स्क्‍वॉड्रन लीडर अर्पिता मुखर्जी यांनी केले.

...सुखोई-30 चा गडगडाट...
भारतीय हवाईदलातील एक शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या सुखोई-30 एमकेआय या दोन इंजिन असलेल्या विमानाचे आगमन होताच जणू विजेचा कडकडाट झाल्याचा भास झाला. या विमानाने वायुवेगाने येत प्रेक्षकांच्या डोक्‍यावरून उभ्या रेषेत उड्डाण केले आणि अवघ्या काही क्षणांतच अवकाशात गुडूप झाले. विमान दिसेनासे झाले पण त्याचा प्रचंड आवाज मात्र बराच काळ घुमत राहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sun's rays, the colors of the tunnel and the Sukhoi rocked the sky