बॅटरी बंद पडल्याने सुपरचे "हार्ट फेल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नागपूर ः गेल्या दोन वर्षांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय विभागात बाह्यरुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. येथील एन्जिओप्लास्टी विभाग असो की, सीव्हीटीएस हे दोन्ही विभाग गरिबांच्या हृदयावर वरदान ठरले आहेत. यामुळेच येथील हृदयविभागात वेटिंगलिस्ट असते. मात्र, शनिवारी अचानक हृदयावरील सीव्हीटीएस विभागात एका आवश्‍यक यंत्रातील "बॅटरी' बिघडली आणि हृदयावरील शस्त्रक्रियांना थांबा लागला. हृदयावरील "बायपास'ची शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना पुढील सात दिवसांनंतर बोलविण्यात आले. एका बॅटरीने सुपर स्पेशालिटीचे हार्ट फेल केले अशी चर्चा येथे आहे.

दोन वर्षांपूर्वी सुपरच्या हृदय विभागात एककल्ली कारभार होता. दर दिवसाला केवळ एक सर्जरी होत असे. यामुळे बायपासची गरज असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांसह नातेवाइकांची प्रचंड ओरड होती. मात्र, प्रसिद्ध हृदयशल्यक्रियातज्ज्ञ डॉ. निकुंज पवार यांच्या हातात सुपरच्या सीव्हीटीएस विभागातील हृदयाची सूत्रे आल्यानंतर या विभागातील मृत्युदर कमी झाला. दोन किंवा तीन शस्त्रकिया दर दिवसाला होऊ लागल्या. हृदयावरील बायपास शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी कमी होऊ लागली. हृदयावरील शस्त्रक्रियांची संख्या वाढली. गंभीर रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रियेची गरज असेल अशा रुग्णांची आधी शस्त्रक्रिया होऊ लागली. विशेष असे की, दिवाळीचा बेत आखला असताना सुपरमध्ये डॉ. निकुंज पवार यांनी केलेल्या शस्त्रक्रियेसह एन्जिओग्राफीसाठी डॉ. मुकुंद देशपांडे यांनी तर रुग्णाला 10 बॉटल रक्त उपलब्ध करून देणाऱ्या सुपरच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांचे मोलाचे योगदान मिळाल्याने एका 75 वर्षीय वृद्धाचा जीव वाचवण्यात यश आले. या शस्त्रक्रियेतून सुपरमध्ये माणुसकीचे दर्शन घडले. मात्र, अशावेळी प्रशासनाने यंत्रसामग्रीसाठी आवश्‍यक बॅटरी व इतर साहित्याबाबत सजग असणे आवश्‍यक आहे. आता नवीन बॅटरी येण्यास सहा ते सात दिवसांचा अवधी लागणार आहे.
यामुळे रुग्णांची वेटिंग लिस्ट वाढणार आहे.
15 रुग्णांना थांबा
नवीन बॅटरी येण्यास किंवा बॅटरी दुरुस्तीला सुमारे सहा ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्यामुळे सुमारे 15 ते 17 रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहेत. यातील एखाद्या रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असेल अशा रुग्णाच्या जिवावर बेतणारा प्रसंग येऊ शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Super "heart failure" due to battery shutdown