भावाला कडेवर घेऊन तो धावत सुटला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

"साहेब, भावाले दवाखान्यान आनलं... त्याले चालता नाई येत. थो बसू पन नाई शकत... याटो याम्बुलन्स दारात उभी हाये.... स्ट्रेचर नाई तं व्हीलचेर तरी द्या...' परंतु, त्याची विनवणी कुणीही ऐकली नाही. मेडिकलच्या प्रवेशद्वारावरील ही घटना. येथे तैनात परिचर रुग्ण घेऊन नुकताच निघाला होता.

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!

नागपूर - "साहेब, भावाले दवाखान्यान आनलं... त्याले चालता नाई येत. थो बसू पन नाई शकत... याटो याम्बुलन्स दारात उभी हाये.... स्ट्रेचर नाई तं व्हीलचेर तरी द्या...' परंतु, त्याची विनवणी कुणीही ऐकली नाही. मेडिकलच्या प्रवेशद्वारावरील ही घटना. येथे तैनात परिचर रुग्ण घेऊन नुकताच निघाला होता. परिचारिका लगतच्या बाह्यरुग्ण विभागाच्या सर्जरी कक्षात होत्या. अखेर गाठोडे उचलावे, तसे आजारी भावाला उचलले आणि मेडिकलच्या कक्षाच्या दिशेने धावत सुटला... संताप आणणारा हा प्रकार मेडिकलमध्ये काल (ता. 29) निदर्शनास आला. डॉक्‍टरांनी वेळेत उपचार केल्याने तरुणावर सुरळीत उपचार झाले. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी भावाला घेऊन आलेल्या तरुणाला या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मेडिकलमध्ये डॉक्‍टरांनी त्याला तपासल्यानंतर सुपरमध्ये रेफर केले. त्याला घेऊन आई आणि भाऊ ऑटोने सुपरमध्ये दाखल झाले. भोवळ आल्यासारखे वाटत असल्याने पंचेविशीतील तरुण धड बसूही शकत नव्हता. उभे राहण्याइतके बळ त्याच्या पायातही नव्हते. त्यामुळे भाऊ सुरुवातीला धावत गेला. कुठे स्ट्रेचर, व्हीलचेअर मिळते का, हे शोधत तो सैरावैरा पळत होता. मात्र, दोन स्ट्रेचर होते, परंतु, कुलूप बंद होते. भावाला बसणेदेखील असह्य झाल्याने त्याने भावाला दोन्ही हातांनी उचलले आणि तो ओपीडीच्या दिशेने झेपावला. 

स्ट्रेचर, व्हीलचेअर न मिळणे नेहमीचेच 
मेडिकल, मेयो असो की सुपर, येथे येणारे गरीब रुग्ण उपचार मिळतील, या आशेवर येतात. गरिबांच्या आजारांवर त्यांच्या वेदनांवर उपचारांसाठी वर्षाला कोट्यवधींचा निधी शासन खर्च करते. परंतु, गरिबांना येथे स्ट्रेचर मिळत नाही. रक्ताचे अहवाल वेळेवर मिळत नाही. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरिबांच्या आरोग्याला आधार असल्याने मेडिकल, मेयो आणि सुपरमध्ये रेफर करताना किमान "स्ट्रेचर' उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होणे स्वाभाविक आहे.

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Super Specialty Hospital nagpur