कचऱ्यातून निघणाऱ्या "गॅस'ने गेले सुरेंद्रचे डोळे

प्रमोद काळबांडे
Tuesday, 5 November 2019

""कचरा उचलताना त्यातून निघणाऱ्या "गॅस'ने हळूहळू माह्ये डोळे खराब झाले. आता मले काहीच दिसत नाही. तरी चार वर्षांपासून मी बायकोच्या सहाऱ्यानं कचरा उचलतो. माह्या एक बी खाडा नाही. "सुपरवायझर'कडून "कम्प्लेंट'बी नाही. कचरा उचलाले आता नवी "कंपनी' आली. थे म्हण्ते, पह्यले डोळे सुधरव; मंग काम मिळंन. माह्ये डोळे काही सुधरत नायी. माह्यी नोकरी गेली त माहा संसार उघड्यावर येईन. दोन मुलींचे शिक्षण सुटंन. मले आत्महत्या करण्याचा टाइम यीनं.'' 

नागपूर : सच्चिदानंद नगरचे सुरेंद्र दामाजी गोंडाणे यांची झोप उडाली आहे. त्यांच्यासोबत बोलायला लागताच, त्यांचे डोळे डबडबून येतात. गेल्या 17 वर्षांपासून ते नागपुरातील घराघरांतून कचरा उचलण्याची नोकरी करतात. आता ते नोकरीला असलेल्या "कनक' कंपनीचा नागपूर महानगरपालिकेसोबत असलेला करार संपला आहे. नवीन कंपनीसोबत करार झाला आहे. ती कंपनी आता जुन्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची "फिटनेस टेस्ट' करायला लागली आहे. सुरेंद्रला "अनफिट' दाखविल्यामुळे ते आता हवालदिल झाले आहेत.

संवेदनशील प्रा. डॉ. अरविंद सोवनी यांनी नागपूर शहरातील हनुमाननगर झोन आणि गांधीबाग झोन अंतर्गत सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी "दिवाळीमीलन' सोहळा आयोजित केला. त्या वेळी "अनफिट' ठरविण्यात येत असलेल्या सुरेंद्रसारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. "आमची भाकर हिसकावून राह्यली हे नवी कंपनी' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुजाता बनली सुरेंद्रचे डोळे 
सुरेंद्रची पत्नी सुजाता पहाटे चार वाजता उठून घरची कामे भडाभडा आटोपते. सुरेंद्रचा हात पकडून ती कचरागाडी घेऊन बाहेर पडते. गेली चार वर्षे न चुकता एकही "अब्सेंटी' न होऊ देता नित्यनेमाने काम करते. सुरेंद्रचा सारा भार तिने पेलला आहे. ती आपल्या पतीचे जणू डोळे बनली आहे. मुलगी अकरावीला आणि मुलगा नववीला आहे. पुढचे वर्ष दोघांच्याही बोर्डाच्या परीक्षेच वर्ष आहे. "नोकरी गेली तर संसाराचा सत्यानाश तर होईल, पोरांच्या शिक्षणाचाही कचरा होईल' अशी भीती सुरेंद्र आणि सुजाताला वाटते. या चिंतेने दोघांचाही रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. 

आमी पन्नाशीत बेरोजगार व्हाव का? 
ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची 50 गाठली आहे, त्यांना "अनफिट' करण्यात येणार आहे, अशी भिती स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. ""आम्ही काम करण्यास फिट आहोत. आम्ही उत्तम काम करु शकतो. आम्हाला काढून टाकले तर आम्ही उघड्यावर येऊ. आमी आता काय आमच्या पन्नाशीत बेरोजगार व्हावं का?'', असा सवालही पन्नाशी गाठलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केला. 

"विशेष बाब' म्हणून सुरेंद्रकडे बघावे 
"कनक' कंपनीकडे काम करणारे नागपूर शहरात तीन हजार सफाई कर्मचारी अर्थात "स्वच्छता दूत' आहेत. अर्थात त्यांच्या नोकरीमुळे तीन हजार कुटुंबातील पंधरा हजार सदस्यांची दोन वेळेच्या जेवण्याची सोय होते. यातील 20 टक्‍क्‍यांहून जास्त लोक पन्नाशीत पोहोचले आहेत. त्यांना "अनफिट' ठरवून त्यांची नोकरी गेली तर, या कुटुंबाची उपासमार झाल्याशिवाय राहणार नाही. खासगी असो किंवा सरकारी सर्वच नोकऱ्यांमध्ये 58 च्या वर निवृत्तीचे वय आहे. हे सफाई कर्मचारी काम करण्यास तर एकदम "फिट' आहेत. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय नव्या कंपनीने मुळीच घेऊ नये, असे मत सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करणारे डॉ. अरविंद सोवनी यांनी व्यक्त केले. सुरेंद्र गोंडाणे यांना विशेष बाब म्हणून नोकरीत कायम राहू द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surendra's eyes went through the "gas" emanating from the trash