सुरेश पाचकवडे म्हणाले, समाजमन घडविण्याचा वसा घ्या 

Suresh Pachkawade said, Make society
Suresh Pachkawade said, Make society

नागपूर : ही भूमी थोर साहित्यिकांची, कवींची अन्‌ संशोधकांची आहे. या भूमीला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. येथील साहित्यिकांची वृत्ती जागरूक असते. ते स्वत:च्या लेखणीतून समाजमन घडविण्याचा प्रयत्न करतात. हाच वसा नवोदितांनी ओळखावा अन्‌ तसे लेखन करावे. स्वत:च्या कल्पनाविष्काराने समाजात चैतन्य निर्माण करावे, असे आवाहन कवी सुरेश पाचकवडे यांनी केले. 

सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईद्वारे आयोजित चौथे राज्यस्तरीय एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन पं. बच्छराज व्यास विद्यालयात झाले. उद्‌घाटन गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी केले. कवी सुरेश पाचकवडे संमेलनाचे अध्यक्ष होते.

मंचावर स्वागताध्यक्ष स्थलसेनेचे सेवानिवृत्त कमिशन्ड ऑफिसर मनीष जोशी, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी, माजी महापौर नंदा जिचकार, विवेक कवठेकर, रमेशचंद्र दीक्षित उपस्थित होते. ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. 

सुरेश पाचकवडे म्हणाले, परिस्थितीने मला लिहिते केले. मी गरिबी लेखणीतून व्यक्‍त केली. लोक त्याला कविता समजू लागले. आता व्यवसाय करतो, तरीही कविता हेच माझे जीवन आहे. थोर साहित्यिक राम शेवाळकर, श्रीधर शनवारे, कवी ग्रेस, महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार, सुधाकर गायधनी यांच्या मौलिक साहित्य निर्मितीने समृद्ध झालेल्या भूमीवर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले, मी भाग्यवान आहे, असेही नमूद केले. 

स्वागताध्यक्ष मनीष जोशी यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. तर माजी महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी पालकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. संमेलनात रवींद्र जवादे लिखित "गाई गेल्या राना' ललितलेख संग्रह, गणेश भाकरे यांचा "विठोबा की विठूमाउली' कवितासंग्रह तर मीनल येवले लिखित "फूल' पुस्तकांचे प्रकाशन झाले. 

समृद्धीसाठी संमेलन गरजेचे

भीमराव पांचाळे यांनी साहित्यविश्‍वातील समृद्धीसाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे मत व्यक्‍त केले. साहित्य संमेलनात सातत्याने जाणाऱ्या प्रेक्षकांचे विचार प्रगल्भ होतात. त्याच्या वैचारिक कक्षा रुंदावतात. भविष्यातील आव्हाने पेलण्याची शक्‍ती त्यांना मिळते. हाच त्याच्या मनावर झालेला संस्कार असतो. जो समकाळात गरजेचा असल्याचे भीमराव पांचाळे यांनी सांगितले व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

सृजन प्रतिभा वाङ्‌मय पुरस्कार प्रदान

संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात सृजन प्रतिभा वाङ्‌मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. "झिरो मॅरेज' कथासंग्रहासाठी नागपूरच्या वर्षा किडे-कुळकर्णी, "कविताच माझी कबर' कवितासंग्रहासाठी नाशिकचे संजय चौधरी, "अबोल अश्रू' कवितासंग्रहासाठी अमरावतीचे डॉ. गिरीश खारकर यांना, "वाळवण' कादंबरीसाठी सांगलीचे रवी राजमाने यांना, "मिसाईल मॅन'साठी एकनाथ आव्हाड यांना, "गाव मामाचं हरवलं' साहित्यासाठी नाशिकचे संजय वाघ यांना, सुनील जाधव यांना कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिनकर कुटे यांना "कायधूळ' कथासंग्रहासाठी, रमेश वंसकर यांना "साई सेवक संत सगुण मेरू नाईक चरित्र'साठी पुरस्कृत करण्यात आले. 

अनुदान उपकार नसून जबाबदारी 
दरवर्षी संमेलनाच्या आयोजनासठी अनुदान मागणीसाठी शेकडो अर्ज येतात. त्यातून 15 संस्थांची निवड होत असे. यावर्षीपासून हा आकडा 30 करण्यात आला आहे. साहित्य संमेलनासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान म्हणजे साहित्यिकांवरील उपकार नव्हे तर त्यांच्या साहित्यासाठी सहकार्य असते. ही शासन आपली जबाबदारी मानतो. 
- आशुतोष अडोणी, 
सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com