२० लाखांचे बक्षीस असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांची शरणागती

आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
Surrender scheme 2 extremist Naxalites Maoists gadchiroli sp ankit goyal
Surrender scheme 2 extremist Naxalites Maoists gadchiroli sp ankit goyalsakal

गडचिरोली : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच २० लाख रुपये बक्षीस असलेल्या २ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी बुधवार (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली.

दीपक उर्फ मुन्शी रामसु ईष्टाम ( वय ३४) रा. गडेरी, पोलिस मदत केंद्र कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली व शामबत्ती नेवरु आलाम (वय २५) रा. हिदवाडा पोलिस स्टेशन ओरच्छा जि. नारायणपुर (राज्य छत्तीसगड) यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यापुढे शरणागती पत्करली. दीपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र.२१ मध्ये कार्यरत होते. दीपक ईष्टाम हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटुन सदस्य म्हणुन कार्यरत होती.

दीपक ईष्टामवर खूनाचे ३, चकमकीचे ८, जाळपोळ २ असे गुन्हे दाखल असुन, माहे जुलै- २००१ मध्ये तो कसनसुर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. ऑक्टोंबर २००१ते नोव्हेंबर २००२ पर्यंत तो चामोर्शी दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्यानंतर ऑक्टोंबर २००४ पर्यंत तो सीसीएम देवजी यांच्या प्रोटेक्शन गार्डमध्ये कार्यरत होता. नंतर २००६ पर्यंत कंपनी क्र.१ मध्ये ए सेक्शनमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्यानंतर २००९ ते २०१५पर्यंत कंपनी क्र.१ ए प्लाटुन कमांडर पदावर व त्यानंतर २०१५ ते आजपर्यंत प्लाटुन क्र. २१ मध्ये डीव्हीसी पदावर कार्यरत होता. नक्षलमध्ये कार्यरत असताना त्याने विविध ठिकाणी ६ अॅम्बुश लावले होते.

त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये छत्तीसगडमधील कुदुरघाटी ४, झाराघाटी २, कांगेरा २५ असे एकुण ३१ जवान शहीद झाले. पत्नी शामबत्ती हिच्यावर चकमकीचे २ असे गुन्हे दाखल असून, ती २०१५ मध्ये ८ महीने जनमिलीशियामध्ये व त्यानंतर प्लाटुन क्र.१६ मध्ये सदस्य पदावर भरती होउन आजपर्यंत प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होती. शासनाने दीपक ईष्टामवर १६ लाख रुपयाचे तर शामबत्ती आलाम हिच्यावर ४ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे पुनर्वसनाकरिता शासनाकडुन दीपक ईष्टामला ६ लाख रुपये व शामबत्ती आलामला २.५ लाख रुपये तसेच पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त १.५ लाख असे एकुण १० लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ ते २०२२ आतापर्यंत एकुण ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ५ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३४ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवुन मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल' अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडुन मोठी भुमिका बजावली आहे. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर २ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाल्याचे पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले.

आतापर्यंत ६४९ नक्षलवादी शरण

आतापर्यंत एकुण ६४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले असून गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातुन एकुण १४४ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना भुखंड वाटप, ११७ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात सामिल होवुन सन्मानाने जीवन जगत आहेत. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलिस अधीक्षक. अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com