शिवाजी महाराजांची पायधुळ चंद्रपुरच्या वेशीला लागली होती का?

shivaji
shivaji

धाबा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी चंद्रपूरचे काय नाते ? चंद्रपूरचे गोंडराजे औरंगजेबाचे मांडलिक होते. औरंगजेब तर शिवाजी महाराजांचे प्राण घेण्यास टपुन बसला होता. अशा स्थितीत धोका पत्करून महाकाली मातेचे दर्शन घेण्यास छत्रपती शिवाजी महाराज चंद्रपूरात आले असावे काय ? हे आजही रहस्य आहे. एकान्नव कलमी बखरी मध्ये राजे " चांदे " प्रातांतून गेले अशी नोंद आहे. मात्र याबाबत ठोस पुरावे अद्याप इतिहास अभ्यासकांना सापडलेले नाही.


मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि राजे शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजेंनी शिवाजी महाराजांना आग्र्यास पाठविले. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मिर्झा राजांनी आग्रह धरला म्हणून राजे औरंगजेबाला भेटले. 12 मे रोजी ते आग्र्यात आले. त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली. यानंतर राजांना कैद करण्यात आले. मोगलांच्या राजधानीतून,त्यांच्या कैदेतून कुणाचीच सुटका झाली नव्हती. मात्र राजांनी मोठ्या शिताफिने,गनिमी काव्याने आग्र्यातून स्वत:ची सुटका करून घेतली. सुटके नंतरचा राजांच्या आग्रा ते रायगड प्रवासावर गुढतेचे वलय आहे. काही अभ्यासकांचा मते आग्य्राहून सुटका झाल्यानंतर शिवाजी राजे चंद्रपूर मार्गे आले होते. चंद्रपूर जिल्ह्यात अशी आख्यायिका आहे की,चंद्रपूरात आल्यावर राजांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. शिवाजी राजांच्या चंद्रपूर प्रवासाबाबत अद्यापही ठोस पुरावा अभ्यासकांना सापडलेला नाही. त्यामुळे महाराजांच्या चंद्रपूर प्रवासाचे गुढ आजही कायम आहे.

इतिहासातील नोंदी...

एकावन्न कलमी बखरीमध्ये कलमे 55 ते 59 ( पृष्ठ 139) मध्ये आलेला उल्लेख " चंद्रपूरचा इतिहास " या पुस्तकात लेखक अ. ज. राजूरकर यांनी दिला आहे. तो असा " ...सर्व यात्रा करून देवगडच्या मार्गे चांदे प्रांतातून ,गंगा इंदूर प्रांत उतरोन,बालेघाट बालेघाट उतरोन,कडेवलीतास आले..त्याउपर त्याच वेषे भिमा उतरोन स्वराज्यात आले. पाचाडी येऊन रायगडाच्या दरवाजियास दाखल झाले "

अद्याप ठोस पुरावा नाही
शिवाजी महाराज यांचा आग्रा ते रायगड प्रवास अभ्यासकांसाठी आजही रहस्य बनले आहे. अ. ज. राजूरकर यांच्या " चंद्रपूरचा इतिहास " आणि यदुनाथ सरकार यांच्या " औरंगजेबाचा इतिहास " या पुस्तकात राजे चंद्रपूर मार्गे गेले असा उल्लेख आढळतो. राजांनी महाकालीचे दर्शन घेतले अशी आख्यायिका आहे. मात्र याचा लिखित अथवा कुठलाच ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही.

अशोक सिंह ठाकूर,इतिहास अभ्यासक चंद्रपूर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com