
-मंगरुळपीर तालुक्यातील घटना
-डोक्यात मारली जड वस्तू
-आरोपीस अटक
मंगरुळपीर (जि.वाशीम) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने डोक्यावर जड वस्तूने मारून पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील पोघात येथे (ता. 13) चे रात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोशन खान रशीद खान (वय 45) रा. पोघात यांनी तक्रार दिली की, ता. 13 नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादीची आई नजीराबी ही फिर्यादीचे घरी आली व फिर्यादीस म्हणाली की, आरोपी एजाज खान रोशन खान (वय 32) रा. पोघात याने त्याची पत्नी बिलकीस बी (वय 30) ही झोपेत असताना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारल्याने डोक्याला जखम होऊन रक्त निघत आहे व ती मरण पावली आहे.
आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवाने मारले आहे. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याचेवर कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे, पीएसआय मंजुषा मोरे, पीएसआय प्रमोद सोनवणे, सुष्मा परंडे, हेकॉ. अंबादास राठोड, साहेबराव राऊत, एएसआय भगत, संदीप खडसे, उमेश ठाकरे, अमोल मुंदे, किशोर काकडे, मोहम्मद परसुवाले, गोपाल कवर, मिलिंद भगत, सचिन शिंदे, होमगार्ड शितालदास उचित व इतर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.
आरोपी होता विष घेण्याच्या तयारीत
घटनेतील आरोपी हा विष घेवून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. तसेच त्याच्या हातातून पोलिसांनी सदर विषाची बॉटल जप्त करून किन्हीराजा येथून तत्काळ सापळा रचून शिताफीने अटक केली.
आरोपीला न्यायालयीन कोठडी
आरोपीची मानसिक स्थिती बरी नसल्याने पोलिस कोठडीची मागणी राखून ठेऊन न्यायालयीन कोठडीची मागणी केली तसेच न्यायालयाने सदर मागणी मान्य करून आरोपीची रवानगी जिल्हा कारागृह वाशीम येथे केली. या आरोपीस दोन तासात अटक केल्याने पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलिसांची प्रशंसा केली आहे.
...तेव्हापासून तिसरी खुनाची घटना
ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यात तीन महिन्यातील ही तिसरी खुनाची घटना असून, तिन्ही गुन्ह्यातील आरोपीना पोलिसांनी पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात तत्काळ अटक केल्याची माहिती ठाणेदार विनोद दिघोरे यांनी दिली.