वृद्ध बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू

वृद्ध बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू

नागपूर - बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तात्या टोपे नगरातील एका घरात कुजलेल्या अवस्थेत दोन वृद्ध व्यक्तींचे मृतदेह आढळून आले. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. मोहन रंझुमल मोटवाणी (वय ८०) असे वृद्ध पुरुषाचे तर शांता रंझुमल मोटवाणी (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे. दोघेही मृत बहीण-भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वृद्धापकाळाने दोघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

बजाजनगर पोलिस स्टेशन हद्दीतील तात्या टोपे नगर परिसरात एका जुनाट बांधकाम असलेल्या घरात मोहन आणि शांता हे दोघे बहीण-भाऊ राहत होते. मोहन मोटवाणी रेल्वे विभागात नोकरीवर होते. बहीण शांता अविवाहित होती. त्यामुळे दोघेही बहीण-भाऊ सोबत वडिलोपार्जित असलेल्या घरात राहायचे. कधीतरी घराबाहेर पडत होते. मोहन हेच नेहमी भाजीपाला किंवा दूध आणण्यासाठी बाहेर पडत होते, तसेच घराला आतून कायम कुलूप लावलेले असायचे. स्वतःला कुलूपबंद घरात ठेवणारे हे वृद्ध बहीण-भाऊ अत्यंत अस्ताव्यस्त असलेल्या घरात राहायचे. मोहनलाल यांचा मृत्यू सुमारे पाच दिवसांपूर्वी व बहिणीचा मृत्यू ३ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

मोहनलाल यांचा मृतदेह फारच कुजलेल्या अवस्थेत आतील खोलीत पडून होता तर शांता यांचा मृतदेह तुलनेत कमी कुजलेला होता. घरात प्रवेश करणाऱ्या गेटजवळील जिन्याजवळ तो पडून होता. मृतांना मूलबाळ नव्हते किंवा नातेवाईकदेखील संपर्कात नव्हते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या प्रकरणाची नोंद केली आहे.

कुत्र्याचाही मृत्यू
मोहन मोटवाणी यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता. त्यांच्याकडे कधीकाळी ५ ते ६ कुत्री होती. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे एकच कुत्रा होता. घरात वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर भुकेने व्याकूळ झालेल्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. कुत्रा घरात मोहन यांच्या मृतदेहाजवळ मृतावस्थेत पडून होता. 

दुर्गंधीमुळे घटना उघडकीस
सोमवार सायंकाळपासून मोहन यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. काहीतरी कुजले असावे, असा समज शेजाऱ्यांचा झाला. त्यामुळे त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आज मंगळवारी दुपारपासून जास्तच दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 

मोहन यांच्या मृतदेहाजवळ एक मोबाईल आढळून आला. चार्जिंग नसल्यामुळे तूर्तास काही कळू शकले नाही. मात्र, मोबाईलमध्ये असलेल्या संपर्क क्रमांकावर फोन लावून घटना कळविण्यात येणार असून नातेवाइकांचा शोध घेण्यात येईल. 
-ज्ञानेश्‍वर पाटील, ठाणेदार, बजाजनगर पोलिस स्टेशन.

भुकेने व्याकूळ झाल्याने मृत्यू?
वृद्ध मोहन आणि बहीण शांता या दोघांनाही वयोमानामुळे फारशी हालचाल करता येत नव्हती. त्यांनी घरकामासाठी कोणालाही ठेवले नव्हते. मोहन बिछान्यावर खिळल्यानंतर शांता यांनाही हालचाल करता आली नसावी. त्यामुळे दोघांचाही भुकेने आणि तहानेने व्याकूळ होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com