रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (अप्रेंटिसशिप) घनश्‍याम सुनील हिंगणे (21, रा. आंबेलोहर, ता. जामनेर जि. जळगाव) याचा संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह बेलीशॉप, मोतीबाग येथील फुटबॉल मैदानालगतच्या स्वीमिंग टॅंकमध्ये आढळला.

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू
नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (अप्रेंटिसशिप) घनश्‍याम सुनील हिंगणे (21, रा. आंबेलोहर, ता. जामनेर जि. जळगाव) याचा संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह बेलीशॉप, मोतीबाग येथील फुटबॉल मैदानालगतच्या स्वीमिंग टॅंकमध्ये आढळला.
आयटीआय उत्तीर्ण तरुणांना रेल्वेत अप्रेंटिसशिपची संधी दिली आहे. त्यातील फिटर ट्रेडचे आठ तरुण 13 एप्रिलपासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी नऊला रेल्वेच्या काही अनुभवी कर्मचारी आणि चार प्रशिक्षणार्थी उमेदवार अशा सात ते आठ जणांकडे मोतीबाग रेल्वे कॉलनीतील इमारत क्र. 154 च्या छतावरील पाईप बदलण्याचे काम सोपविले. त्यानुसार, सर्वांनी काम सुरू केले. दहा ते सव्वादहाच्या सुमारास वरिष्ठ कर्मचाऱ्याला पाणी पिण्यासाठी जात असल्याचे सांगून धनश्‍याम निघून गेला. दुपारी साडेबाराच्या सुमारास घनश्‍याम मृतावस्थेत स्वीमिंग टॅंकमध्ये पडून असल्याची माहिती मिळाली. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि स्वीमिंग टॅंककडे धाव घेतली. तोवर मृतदेह उचलून मेयो रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची सूचना दिली असून, ते नागपूरला येण्यासाठी निघाले आहेत.  
स्वीमिंग टॅंकमध्ये केवळ अर्धाफूट पाणी
घनश्‍यामचा मृतदेह आढळलेले स्वीमिंग टॅंक बंद आहे. त्यात केवळ अर्धाफूट पाणी होते. यानंतरही त्याचा मृत्यू झाला कसा? कोणतेही काम नसताना तो स्वीमिंग टॅंकडे गेलाच कशाला? या उनुत्तरित प्रश्‍नांमुळे शंका-कुशंका उपस्थित केली जात आहे.
उमेदीच्या काळात स्वप्नांचा चुराडा
शेतकरी कुटुंबातील घनश्‍यामची मोठी बहीण विवाहित असून, लहान भाऊ आहे. कुटुंबीयांना त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. उमेदीच्या काळातच काळाने त्याला हिरावून नेले आणि त्याच्यासह कुटुंबीयांच्याही स्वप्नांचा चुराडा झाला.
रेल्वे कर्मचाऱ्यांचा गोंधळ
सायंकाळनंतर संतप्त रेल्वेकर्मचारी मोठ्या संख्येने रेल्वे रुग्णालयासमोर गोळा झाले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर आणि मोतीबाग येथील आरपीएफ जवानांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले.