स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पक्षाला बळकटी व काम वाढवण्याची महत्वाची जबाबदारी तुपकर यांना पार पाडावी लागणार अाहे. शेतकरी प्रश्नांवर होणाऱ्या अांदोलनांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. हा प्रतिसाद थेट मतपेटीपर्यंत कसा पोचेल, यासाठी रणनिती अाखावी लागेल. 

अकोला : स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाणा जिल्ह्यातील तरुण व अाक्रमक शैली असलेले रविकांत तुपकर यांची गुरुवारी (ता.१२) नियुक्ती करण्यात अाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी देहू (जि. पुणे) येथे सुरु असलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत घोषणा केली. 

राज्यात ऊस, कापूस, सोयाबीन अादी पिकांसाठी होणाऱ्या अांदोलनांचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत काम करणारे रविकांत तुपकर राज्यभरात अोळखले जातात. सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या बाहेर काढल्यानंतर प्रमुख जबाबदारी तुपकर यांनी सांभाळलेली अाहे. 

अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पक्षाला बळकटी व काम वाढवण्याची महत्वाची जबाबदारी तुपकर यांना पार पाडावी लागणार अाहे. शेतकरी प्रश्नांवर होणाऱ्या अांदोलनांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. हा प्रतिसाद थेट मतपेटीपर्यंत कसा पोचेल, यासाठी रणनिती अाखावी लागेल. 

स्वाभिमानी संघटना राज्यात भाजप-सेना युतीसोबत गेल्याचे फळ म्हणून पहिल्यांदा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद संघटनेला मिळाले होते. खासदार शेट्टींनी ही जबाबदारी तुपकरांच्या खांद्यावर टाकली. त्यानंतर मिळालेले राज्यमंत्रिपद सदाभाऊंना दिले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानीचे सरकारसोबत न जुळल्याने संघटना सत्तेतून बाहेर पडली. त्यावेळी तुपकरांनी पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सादर केला. 

सत्तेतून बाहेर अाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर अांदोलने करीत अाहे. तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून संघटना वाढीसाठी कार्यरत अाहेत. बुलडाणा, वाशीम, अमरावती जिल्ह्यात संघटना बळकट होत अाहे. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर,यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये संघटनेची पाळेमुळे रुजवण्याचे प्रयत्न सुरु अाहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अाक्रमक असलेल्या तुपकरांची निवड करण्यात अाल्याने त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांमध्येही वाढ झाली अाहे.   

Web Title: Swabhimani Shetkari Union State President Ravikant Tupkar