स्वप्नील करतोय जखमी पशु-पक्ष्यांची शुश्रूषा

नीलेश डाखोरे
रविवार, 29 जुलै 2018

नागपूर - अपघातग्रस्त मनुष्याच्या मदतीसाठी सारेच जण धावतात. मात्र, विविध अपघात व नैसर्गिक आपत्तीत जखमी होणाऱ्या पशू, पक्षी आणि प्राण्यांचे काय? त्यांच्या मदतीला कोणी पुढे येत नाही. समाजात माणुसकीचा झरा आटत चालला असल्याची कितीही ओरड होत असली तरी अजूनही कुठेना कुठे आशेचा किरण दिसून येतो. असाच एक किरण आहे स्वप्नील बोधाने.

लहानपणापासून प्राण्यांविषयी प्रेम असलेल्या स्वप्नीलने जखमी प्राण्यांवर उपचार करण्याचा प्रण घेतला. मोठ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या किंवा मनुष्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांवर पदरमोड करून उपचार करीत त्यांना जीवदान देतोय. सोबतच भांडेवाडीतील पशुनिवारण केंद्रातही काम करतोय. स्वप्नील बी. ए. फायनलचे शिक्षण घेत आहे. जखमी अवस्थेत सापडणारे प्राणी हे बहुतेकदा माणसाच्या चुकांमुळेच जखमी अवस्थेत सापडतात. वाहनाने धडक दिल्याने जखमी होणाऱ्या प्राण्यांचीही संख्या जास्त आहे. पतंगाच्या मांज्यात अडकलेले पक्षी, दूषित पाण्यामुळे आजारी पडणारे प्राणी-पक्षी, जंगलातून भटकून मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी अशा प्राण्यांवर उपचार केल्याचे स्वप्नील सांगतो. वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी उमरेडमध्ये त्याने ३०० जलकुंडाचे वाटप केले आहे. स्वप्नील सर्पमित्र म्हणूनही काम करतो.

सोशल मीडियाचा वापर
वन्यप्राण्यांच्या खाद्यासाठी जंगलात बीजारोपण करणे, फळांचे झाड लावणे, गवत लावण्याचा उपक्रम स्वप्नीलने सुरू केला आहे. यासाठी त्याने बोर, जांभूळ आदी फळांच्या बिया गोळा करणे सुरू केले आहे. सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना बिया जमा करून पाठविण्याचे अवाहन तो करीत आहे.

प्राणिमात्रांवर प्रेम करा, असे सांगणारी आपली संस्कृती आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असून याला पशू, पक्षी, जनावरेही अपवाद नाहीत. याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.
- स्वप्नील बोधाने, प्राणिमित्र.

Web Title: swapnil bodhane animal bird care motivation