देवाच्या रूपात मित्रच मदतीला धावला!

Swapnil-Jhagare
Swapnil-Jhagare

तिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण
पुसद (जि. यवतमाळ) - ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता.११) सायंकाळी पुसद शहरातील चौबारा चौकातील लोकांनी अनुभवला. पतंग काढण्यासाठी चढलेला स्वप्नील झगरे हा शाळकरी मुलगा तीन मजली इमारतीवरून पतंगासह खाली पडला. सुदैवाने तो पतंग पकडण्यासाठी धावलेल्या मित्राच्या पाठीवर अलगद पडला. यात त्याला  कुठलीही इजा झाली नाही. जणू मित्रच त्याच्या मदतीला धावून आला. मित्रालासुद्धा साधे खरचटले नाही. पतंगासह खाली कोसळणाऱ्या स्वप्नीलचा हा सीसीटीव्ही फुटेज जिवाचा थरकाप उडवितो. 

स्वप्नील विजय झगरे हा ११ वर्षीय मुलगा कोषटवार शाळेत पाचवीत शिकतो. चौबारा चौकात आई आणि आजोबा श्रीराम चेके यांच्यासोबत तो राहतो. दिवाळीच्या सुट्या असल्याने तो मित्रांसोबत चौबारा परिसरातील अतुल रेवणवार यांच्या घरासमोर खेळत होता. त्याला इमारतीच्या उंच टोकावर पतंग अडकलेली दिसली. ती काढण्यासाठी स्वप्नील छतावर चढला आणि त्याचा  मित्र अमोघ तगलपल्लेवार खाली थांबला. पतंग काढण्याच्या प्रयत्नात स्वप्नीलचा तोल गेला  व तो पतंगासह सर्व्हिसलाइनच्या वीज तारेवर पडला. त्यासरशी वीज तारही तुटली. स्वप्नील खाली कोसळला तो नेमका पतंग पकडण्यासाठी वाकलेल्या मित्राच्या पाठीवर.

क्षणभर कुणाला काही कळले नाही. दुसऱ्याक्षणी उठून बसत स्वप्नील मित्रांसह पतंग घेऊन निघून गेला. भांगडे चिल्ड्रन हॉस्पिटलमधून ड्युटी आटोपून स्वप्नीलची आई स्वाती झगरे घरी आल्या तेव्हा स्वप्नीलच्या मित्रांनी ती घटना त्यांना सांगितली. घटनेवर त्यांचा विश्‍वासच बसेना. आईने स्वप्नीलला पटकन कुशीत कवटाळले अन्‌ आनंदाश्रू गालावर ओंझळताना देवाचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com