मला वाचवा हो, मला पाणी द्या हो

केवल जीवनतारे
मंगळवार, 19 जून 2018

वैशालीनगर : ""वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. "मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले. पहाटेचे पाच वाजलेले. "स्विमिंग पूलमध्ये कुणी बुडत तर नसेल ना?' अशी शंका काहींच्या मनात आली. "अरे पण तलावात तर पाणीच नाही? मग बुडणार तरी कसे?.' असा विचार दुसऱ्याच क्षणी आला. एवढ्यात पुन्हा आवाज घुमला. ""वाचवाऽऽ वाचवा ऽऽ मला वाचवा.'' आवाज थेट स्विमिंग पुलमधून येत होता. लोक तळाकडे पाहून लागले. पुन्हा आवाज आला, ""होय, मी जलतरण तलाव बोलतोय.'' 

जमलेले लोक भानावर आले. खुद्द तलाव बोलतोय, हे त्यांना समजले. लोक कान देऊन ऐकू लागले. आवाज पुन्हा घुमू लागला.

"पाच वर्षांपूर्वी दलित वस्ती सुधार योजनेतून माझे बांधकाम झाले. उत्तर नागपुरातील तत्कालीन आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या निधीतून पाऊणेदोन कोटी खर्च करण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासने यासाठी पुढाकार घेतला. 25 बाय 13 मीटर एवढा माझा आकार. लहानग्यांसाठी वेगळा "पॅडल पूल'. 2 बाय 2 मीटर बॅलेसिंग टॅंक. फिल्ट्रेशन युनिटची सोय. तीन साडेतीन वर्षांनंतर खूप लोक आले. मला तारीखही आठवते. 1 जानेवारी 2017. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, विद्यमान आमदार, महापौर, महापालिका आयुक्त, "एनआयटी'चे अधिकारी आले. त्यांच्या उपस्थितीत माझ्या उद्‌घाटनाचा कार्यक्रमही मोठ्या थाटात झाला. पण, माझा जीव की प्राण असलेले पाणी मला मिळू शकले नाही हो! मी पाच वर्षांपासून कोरडा ठण्ण पडलो आहे.'' 
लोक ऐकत होते. चित्र आता पुरते स्पष्ट झाले. पंचशीलनगर, वैशालीनगर, कमाल चौक, बारसेनगर, इंदोरा, बाळाभाऊ पेठ, लष्करीबाग, नवा नकाशासह प्रभाग 2, 3, 6, 7 मधीलही काही लोक होते. तलावाचे ऐकत असताना त्यांच्या डोळ्यांसमोरून हा सारा "फ्लॅश बॅक' तरळला. 

"पश्‍चिम' असते तर... 
लोकांना तलावाचे पटले. ते विचार करू लागले. जलतरण तलावाच्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. मात्र केवळ पाणी नाही. त्यामुळे तो अजून लोकांसाठी खुला झाला नाही. येथे दिवसभर कुत्रे बसून दिसतात. सुरक्षारक्षक आहे, म्हणून सध्या बेकायदा धंदे इथे होत नाहीत एवढेच. परंतु, पुढे या येथील इमारतीच्या खिडक्‍या, दरवाजे, चेंजिंग रूममधील साहित्य, नळाच्या तोट्या दिवेही चोरीला जाऊ शकतात. रोज नियमित फिरायला येणारे डॉ. विनोद डोंगरेही लोकांमध्ये होते. ते पुटपुटले, ""पश्‍चिम नागपुरात हा तलाव असता तर केव्हाच सुरू झाला असता.'' असाच विचार अनेकांच्या मनातही सुरू होता. ""मागास भाग आहे. लक्ष देणार तरी कसे?'' एवढ्यात पुन्हा आवाज आला. ""मला वाचवाऽऽ, मला पाणी द्या''. आता लोकही घोषणा देऊ लागले, ""पाणी द्याऽऽ पाणी द्याऽऽ. वैशाली नगर स्विमिंग पूलला पाणी द्याऽऽ.'' स्विमिंग पूलचा टाहो आणि नागरिकांच्या घोषणांनी आसमंत निनादून उठला. 

Web Title: Swimming pool talk