स्वाइन फ्लूची पूर्व विदर्भात दहशत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नागपूर : विदर्भात डेंगीसह स्क्रब टायफसचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्यापेक्षा भयावह असलेल्या स्वाइन फ्लूने पूर्व विदर्भात दहशत पसरवली आहे. मागील 10 महिन्यांत स्वाइन फ्लूच्या 387 रुग्णांची नोंद झाली असून, यातील 44 जण दगावले आहेत. 

नागपूर : विदर्भात डेंगीसह स्क्रब टायफसचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्यापेक्षा भयावह असलेल्या स्वाइन फ्लूने पूर्व विदर्भात दहशत पसरवली आहे. मागील 10 महिन्यांत स्वाइन फ्लूच्या 387 रुग्णांची नोंद झाली असून, यातील 44 जण दगावले आहेत. 
केंद्र शासनाने स्वाइन फ्लू आजाराला नोटीफाईड डिसीजच्या कक्षेत घेतले आहे. त्यामुळे स्वाइन बाधितांची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला कळविणे बंधनकारक आहे. मात्र मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयांकडून काही प्रमाणात माहिती पुढे येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या काळात या आजाराची माहिती दडवणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा येऊ शकतो, असे आरोग्य विभागात झालेल्या चर्चेतून पुढे आले. दरम्यान, मोठी रुग्णालये त्याबाबत गंभीर नसल्याने नेमका आकडा समोर येण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या आजाराची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही येत नसल्याची चर्चा दिसून आली. स्वाइन फ्लू ओसरला असे सांगण्यात येत आहे, मात्र पूर्व विदर्भात 387 रुग्णांची नोंद झाली. सध्या हवेत गारवा असल्याने पुन्हा रुग्ण वाढतील असे सांगण्यात आले. यामुळे एकूणच आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. 
माहिती सादर करण्याच्या सूचना 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तातडीने शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयांत औषधांसह प्रतिबंधात्मक लशींच्या साठ्याबाबत माहिती घेणे सुरू आहे. सोबत जनजागृतीचे अभियान राबवले जाणार आहे. पॉझिटिव्ह स्वाइन फ्लूग्रस्तांचा इतिहास व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह स्वाइन फ्लूची इतर लक्षणं असल्यास "टॅमीफ्लू'चा डोस देण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनही जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाला अलर्ट दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swine flu outbreak continues