वर्षभरातच उखडला सिंथेटिक ट्रॅक

विविध ठिकाणी उखडलेला  सिंथेटिक ट्रॅक.
विविध ठिकाणी उखडलेला सिंथेटिक ट्रॅक.

नागपूर - कोट्यवधी रुपये खर्च करून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुल परिसरात चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला. मात्र निकृष्ट कामामुळे अवघ्या वर्षभरातच या ट्रॅकचे तीनतेरा वाजले. ट्रॅक जागोजागी उखडल्याने शासनाला कोट्यवधींचा फटका बसला. कंत्राटदाराचा करंटेपणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता हा ट्रॅक नव्याने बांधण्याची सर्कस शासनाला करावी लागणार आहे. ट्रॅक नव्याने टाका, असे आदेश क्रीडा आयुक्तांनी संबंधित कंपनीला दिल्याचे समजते. 

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत जुलै २०१७ मध्ये विदर्भातील पहिला सिंथेटिक ट्रॅक पूर्ण झाला. तब्बल साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात आले. उद्‌घाटनानंतर लगेचच पश्‍चिम विभागीय ॲथलेटिक्‍स स्पर्धा झाली.

त्यावेळेसपासूनच ट्रॅक उखडायला सुरुवात झाली. ट्रॅकवर ग्लूने चिकटविण्यात आलेले रबर निघाले असून, जागोजागी ‘पॅचेस’ पडले आहेत. ‘नव्याने तयार केलेला सर्वांत सुमार सिंथेटिक ट्रॅक’ असे विश्‍लेषण अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंनी केले. 

ग्लूचे प्रमाण कमी
ट्रॅकमध्ये वापरण्यात येणारा ग्लू रबराला चिकटविण्याचे काम करतो. परंतु ग्लूचे प्रमाण कमी असल्यामुळे रबराचा बेस नीट चिकटला नाही. जागोजागी रबराचे बेस उखडण्याचे ते मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते शिवाय दहाव्या व अकराव्या स्तरावर वापरण्यात आलेले इलॅस्टिक रबर व पोर सीलरमध्येदेखील दोष आहे. 

आयुक्‍तांकडून त्रुटींवर बोट
राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी गेल्या महिन्यात ट्रॅकची पाहणी केली. त्यांनी ट्रॅकच्या एकूणच बांधकामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त करीत अनेक त्रुटींवर बोट ठेवले.  हा ट्रॅक पुन्हा नव्याने तयार करावा लागेल, असा शेराही दिला.  

दोषींवर कारवाई होणार काय?
विभागीय क्रीडासंकुल समितीने सिंथेटिक ट्रॅकचे काम हैदराबादच्या ग्रेट स्पोर्टस इन्फ्रा या कंपनीला दिले होते. प्रशांत सातपुते आर्किटेक्‍ट होते. त्यांच्या सदोष व चुकीच्या बांधकामामुळेच ट्रॅकचे तीनतेरा वाजले आहेत. प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार काय, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे.

प्रशासनाचे दावे फोल
या ट्रॅकबद्दल प्रशासनातर्फे त्यावेळी मोठमोठे दावे करण्यात आले होते. सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघा(आयएएएफ)कडून मान्यता मिळाल्याचे तसेच द्वितीय श्रेणीचा दर्जा देण्यात आल्याचीही माहिती क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी दिली होती. मात्र सुमार दर्जाच्या बांधकामामुळे त्यांचे सारे दावेच फोल ठरले आहेत. 

सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम करताना नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. पण, त्यानंतरही त्यात काही त्रुटी राहून गेल्या. अनेक ठिकाणी ट्रॅकवरील रबर उखडले आहे. जे दुरुस्त करण्याची आवश्‍यकता आहे. आम्ही यासंदर्भात कंत्राटदाराकडे नाराजी व्यक्‍त केली असून, तो सदोष बांधकाम दुरुस्त करून देणार आहे. पाऊस थांबल्यानंतर लवकरच हे काम सुरू करण्यात येईल. त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा हा ट्रॅक धावपटूंसाठी खुला करण्यात येईल.
- सुभाष रेवतकर (क्रीडा उपसंचालक, नागपूर विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com