"मुक्ताई'चे पर्यावरण सांभाळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

चंद्रपूर ः चिमूर तालुक्‍यातील डोमा येथील मुक्ताई धबधब्यावर सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होईल, असे कृत्य केले जाते. पर्यावरण आणि आदिवासींच्या प्रेरणास्थळाच्या संरक्षणासाठी युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विरांगणा मुक्ताई आदिवासी सेवा चारीटेबल ट्रस्ट आणि माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने केली आहे.

नागभीड-चिमूर तालुक्‍यातील सात बहिणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोमा येथे मुक्ताई धबधबा आहे. याठिकाणी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. येथील निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेतात. याच ठिकाणी आदिवासींचे श्रद्धास्थान विरांगणा मुक्ताई देवस्थान आहे. या प्रेरणा स्थळावर डोमावासी आणि लाखो आदिवासींची श्रद्धा आहे. हा भाग जंगलात असल्याने वन्यप्राणी आणि पक्षी यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने तसेच बेजबाबदारपणे वागण्याने या प्रेरणास्थळाची विनाकारण बदनामी होत असल्याने समोर आले आहे. आदिवासींच्या व डोमा वासियांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यटकांकडून होत असलेल्या प्लास्टिक आणि इतर कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्येही नाराजी आहे. शिवाय तरुण-तरुणींची अश्‍लील चाळ्यांचे प्रकारही समोर आले आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

पर्यटकांना सूचना
मुक्ताई देवस्थान समिती व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने उन्माद माजवणाऱ्या पर्यटकांच्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहे. मुक्ताई ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलिस येथे पहारा देत आहे. मुक्ताई ट्रस्टच्यावतीने पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सूचना फलक लावले आहे. पर्यटकांना निसर्ग व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत कालावधी ठरवलेला आहे. पर्यटकांनी धबधब्याजवळ स्वयंपाक करू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये. प्लॅस्टिक व इतर वापराच्या वस्तू कचराकुंडीत टाकून परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन सूचना मुक्ताई ट्रस्टचे अध्यक्ष रामराव नन्नावरे यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of Muktai's environment!