esakal | या व्यावसायिकांनो, घ्या कर्ज; बॅंकांची धाव
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

या व्यावसायिकांनो, घ्या कर्ज; बॅंकांची धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : छोट्या व्यावसायिकांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी महसूल प्रशासन तसेच बॅंकांनी कर्ज देण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (ता.29) जिल्हाभरात एका दिवसीय मोहीम राबविण्यात आली असून यात तब्बल 980 अर्ज प्राप्त झाले आहेत.
बेरोजगार युवकांना उद्योग उभा करता यावा, यासाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्याची व्यवस्था निर्माण केली होती. मात्र, काही प्रकरणांमध्ये बॅंकांना वाईट अनुभव आल्याने कर्ज वाटपात बॅंकांनी आखडता हात घेतला आहे. सद्यःस्थितीत मुद्रा योजनेचा "एनपीए' 60 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. अशास्थितीत नवीन कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या मानसिकतेत बॅंका नव्हत्या. गरजू व्यावसायिकांची यामुळे अडचण होत होती.
गरज असलेल्या छोट्या व्यावसायिकांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, या दृष्टीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गरजू व्यावसायिकांना मदत देण्यासंदर्भात आदेश दिले. त्यादृष्टीने बॅंक कर्मचारी तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व्यावसायिकांपर्यंत पोहोचले. अशा पद्धतीने पहिल्यांदाच बॅंका कर्ज घेणाऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, छोट्या व्यावसायिकांची बाजारात क्रेडिट वाढवावी म्हणून आवश्‍यकतेनुसार व्यावसायिकांना "सीसी' उपलब्ध करून दिली जात आहे. भाजीपाला विकणारे, दूध विकणारे अशा व्यावसायिकांसाठी ही अभिनव पद्धत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे. त्यानंतर बुधवारी पात्र व गरजू व्यावसायिकांनाच कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. आतापर्यंत 104 प्रकरणे मंजूर करून छोट्या व्यावसायिकांना बॅंक तसेच महसूल प्रशासनाने दिलासा दिला आहे.

छोटे व्यावसायिक दररोज खासगी बाजारातून काही रक्कम उचलतात. दुसऱ्या दिवशी व्याजासह ती परत करतात. यात अनेकांना जादा रक्कम द्यावी लागते. गरजू व मेहनती छोट्या व्यावसायिकांना ही मदत बॅंकेमार्फत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा वेगळा "ड्राईव्ह'घेण्यात आला. छोटा व्यावसायिक उभा राहावा, हा आमचा प्रयत्न आहे.
- अजय गुल्हाने,
जिल्हाधिकारी, यवतमाळ.

बॅंक सक्रिय
बॅक अधिकारी कर्ज वसुलीसाठी घरी येत असल्याचा अनेकांचा समज आहे. हा समज बदलवित बॅंक अधिकारी कर्ज देण्यासाठी आता घरापर्यंत जात आहे. मुद्रा योजनेचा एनपीए वाढत असतानाही बॅंक अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय मोठा मानला जात आहे.

loading image
go to top