तलाठ्याने उगारली चप्पल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

लाखनी (जि. भंडारा) : सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तलाठी कार्यालयात निराधार योजनेकरिता लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पायपीट करणाऱ्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करून चप्पल उगारण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तलाठी जी. डी. शिवणकर याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

शेवंता हटनागर ही विधवा वृद्धा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून लाखनी येथील तलाठी शिवणकर यांच्याकडे जात होती. परंतु, टाळाटाळ सुरू असल्याने लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तितिरमारे यांना सोबत घेऊन ती कार्यालयात गेली. यावर तलाठ्याने कार्यालयात का आलास, असे म्हणून तितिरमारेवर चप्पल उगारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तलाठ्याचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी प्रदीप तितिरमारे व शेवंता हटनागर यांनी लाखनी तहसीलदार मल्लिक विराणी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले.
कलेक्‍टरकडे जा...
संजय गांधी निराधार योजनेची आवश्‍यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता, तलाठ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही. तुला कुठे जायचे असेल तिथे जा अथवा कलेक्‍टरकडे जा, असे तलाठ्याने फर्मान सोडून वृद्धेला परत पाठविले. याप्रकरणी तहसीलदार कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शासकीय कर्मचारी सामान्य नागरिकांशी असा व्यवहार करीत असल्यास त्यांनी कोणाकडे जावे, असा प्रश्‍न निराधार वृद्धेने उपस्थित केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talathi Recovered Slippers