विदर्भवाद्यांनी रोखली तामिळनाडू एक्‍स्प्रेस

विदर्भवाद्यांनी रोखली तामिळनाडू एक्‍स्प्रेस

विदर्भ राज्य आंदोलन समिती - सुमारे तीन हजार आंदोलकांचा सहभाग
वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव  या प्रमुख मागण्यांकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. सहा) दुपारी सेवाग्राम स्थानकाजवळ ‘रेल रोको’ आंदोलन यशस्वी केले. आधी लोखंडी खांब घेऊन जाणारी मालगाडी अडविली आणि लगेचच चेन्नई येथून दिल्लीकडे निघालेली तामिळनाडू एक्स्प्रेस रोखली. सुमारे ४० मिनिटे हे आंदोलन चालले. दरम्यान, या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 
महिला आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते डॉ. वामनराव चटप, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नवले, ॲड. नंदा पराते, माजी आमदार सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, जगदीश बोंडे, अरुण केदार, मदन कामडी, नंदू खेरडे, प्रभाकर दिवे, गंगाधर मुटे, मधुसूदन हरणे, प्रभाकर दिवे, जनता दलाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी इथापे, जिल्हाध्यक्ष मनोहर पंचारिया, फॉरवर्ड ब्लॉकचे  पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांनी रणरणत्या उन्हात आंदोलनात सहभाग घेतला.

आज सकाळपासूनच विदर्भातील विविध जिल्ह्यांतून गावखेड्यांतून कार्यकर्ते विविध वाहने, बसेस आणि ऑटो आदी वाहनांनी दाखल होऊ लागले. हातात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे झेंडे आणि घोषणा देत सेवाग्राम मार्गावरील उड्डाणपुलाजवळील बोंबटकर लॉनवर हजारोंचा जत्था जमू  लागला. प्रारंभी, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी विविध नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीची मांडणी केली. दुपारी साडेबारा वाजता आंदोलकांनी सुमारे एक किलोमीटर अंतर पायी कापत सेवाग्राम रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेरूळ गाठला. आंदोलक रेल्वेरुळाजवळ येताच नागपूरकडून येत असलेली डब्ल्यू ए. ६-७ एच ३१०८० क्रमांकाची मालगाडी थांबविण्यात आली. ही मालगाडी लोखंडी खांब घेऊन मार्गक्रमण करीत होती. यानंतर १० मिनिटांनी आलेली तामिळनाडू एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक १२६२१) रोखून धरण्यात आली.

आंदोलकांनी दोन्ही गाड्यांच्या इंजिनसमोर चढून वेगळ्या विदर्भाच्या झेंडे फडकविले. ४० मिनिटांच्या आंदोलनानंतर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने आंदोलकांना रुळाबाहेर जाण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com