लेखकांच्या अभिव्यक्तीवर बंधने 

file photo
file photo

नागपूर : अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विषयावर अभिव्यक्त होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनाही लिहिण्या, बोलण्यापासून थांबविले जात आहे, असा थेट आरोप लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी केला. 
कृषी विकास प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 22) थडीपवनीतील नितीन गडकरी कृषी व कौशल्यविकास केंद्राच्या प्रांगणात सातव्या लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या उद्‌घाटनीय सोहळ्यात त्या बोलत होत्या. उद्‌घाटिका अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालक भाग्यश्री बानाईत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, स्वागताध्यक्ष खासदार कृपाल तुमाने, सह स्वागताध्यक्ष प्रकाश तागडे, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, थडीपवनीच्या सरपंच नीलिमा उमरकर, संध्या मातकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस, प्रतिष्ठानचे श्रीराम काळे, राजेश गांधी, बंडोपंत उमरकर, नरेश अडसड आदींची उपस्थित होती. 
महिलाच परिवर्तन घडवू शकतात. परंतु, लेखिका पाने व फुलांच्या कवितांमध्येच रमल्या आहेत. सहन करतो म्हणून काहीही सांगितले जात आहे. आपणही ते मान्य करायला लागलो आहोत. विकासाच्या झंझावाताचे चित्र रंगवून दाखविले जात असतानाच देशात दररोज एक कोटी लोकं उपाशी झोपत आहेत. विशिष्ट प्राण्याचे मांस खाल्ले म्हणून हल्ले केले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी जाहीरपणे अपशब्द वापरले जात आहेत. विरोधी पक्षाची रिंगटोन ठेवली म्हणून मारहाण केली जाते. अशा स्थितीत घाबरून जगण्यापेक्षा त्याविरोधात लेखिकांनी धाडसाने लिहिते होणे आवश्‍यक आहे. लेखिकांनी धारदार लेखणीने अपप्रवृत्तीवर प्रहार केले पाहिजे. आपणच आपले प्रश्‍न मांडले पाहिजे. परंपरागत विषय सोडून पलीकडचे जग मांडा असे आवाहन अरुणा सबाने यांनी केले. 
सतीसावित्री असल्याचे ढोंग आपण मांडतो, पण किती जणांवर प्रेम करतो ते लिहिण्याचे टाळले जाते. राज्यघटनेतील मूल्ये तुडविण्याचाच हा प्रकार आहे. निर्भीडपणे लिहित्या व्हा, लिव्ह इन रिलेशनशिपसारखा विषय हाताळा असेही आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन अर्चना घुळघुळे यांनी केले. डॉ. मोना चिमोटे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com