उत्पन्नवाढीसाठी आगारनिहाय "टार्गेट" 

भूषण काळे 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील, अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत स्थानिक स्तरावर त्यांना विनंती केली जाणार आहे.

अमरावती : लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाकडून उत्पन्नवाढीसाठी प्रासंगिक करारावर फोकस केला जाणार आहे. यासाठी आगारनिहाय टार्गेट ठरवून दिले जाणार आहे. 
महामंडळाकडून प्रासंगिक करारासाठी एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतात. हे प्रमाण वाढवून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी एसटी महामंडळामार्फत नियोजन करण्यात येत आहे. यासाठी विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. यासोबतच आगारनिहाय प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट्य ठरवून देण्यात येणार आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे एसटी महामंडळाने दिले आहे. 
विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती, अशा संस्थांशी स्थानिक पातळीवर संपर्क साधून शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील, अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत स्थानिक स्तरावर त्यांना विनंती केली जाणार आहे. कोणत्याही कारणास्तव प्रासंगिक करारावर बसेसची मागणी नाकारू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत. प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही बस मार्ग बंद राहणार नाहीत किंवा कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही कळविण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांनी सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर घ्याव्यात, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Target-based "Target" for Growth