ग्रामस्थांनी विचारला मुख्याध्यापकांना जाब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

बुलडाणा - शाळेसमोर जमलेले तरोडा येथील ग्रामस्थ.
बुलडाणा - "जात चोरण्याचा धंदा' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 16) वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तरोडा गावात खळबळ उडाली. नागरिकांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला.

बुलडाणा - शाळेसमोर जमलेले तरोडा येथील ग्रामस्थ.
बुलडाणा - "जात चोरण्याचा धंदा' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 16) वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तरोडा गावात खळबळ उडाली. नागरिकांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला.

नागरिकांनी आज शाळेत जाऊन मुख्याध्यापकांविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला. तुम्ही दिलेली प्रतिक्रिया चुकीची असून, आम्ही खरोखर आदिवासी आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारची जात बदललेली नाही व बंजारा नसून, नायकडा या जातीचेच आहोत. सदर जात ही आदिवासी प्रवर्गामध्ये मोडते. गावातील मोठ्या प्रमाणात मुले येथील आदिवासी शाळेत शिक्षण घेत असून, कोणाला जातीबाबत संशय असल्यास त्यांनी येथे येऊन चौकशी करावी. यानंतर वस्तुस्थिती त्यांच्या समोर येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या या भूमिकेनंतर मुख्याध्यापकांनी आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट करीत, नमती भूमिका घेतली.

तरोडा गावातील परिस्थितीची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भामरे सहकाऱ्यांसह तरोडा गावात दाखल झाले. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी वराडे यांच्यासह पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधी गावात पोचले. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती हाताळली व संतप्त नागरिकांना शांत केले. सद्य:स्थितीत या गावातील तणाव पूर्णपणे निवळला असून, सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्याध्यापकांनी चुकीचे मत प्रदर्शित केल्यामुळे गावकऱ्यांनी शाळाबंद आंदोलन करून त्यांचा निषेध केला आहे. जबाबदार अधिकारी येऊन माफी मागेपर्यंत मुलांना शाळेत बसू देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली. पंचायत समितीच्या शिक्षण सभापती उज्ज्वला चोपडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल खाकरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश बस्सी सरपंच स्वरूपसिंग येरवाळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश बस्सी आदी उपस्थित होते.

Web Title: Taroda school public headmaster