लॉकडाउनमुळे झाला टॅक्‍सी प्रवास विमानापेक्षाही महाग 

taxi car
taxi car

अमरावती : विदर्भातील टॅक्‍सीसेवा विमानापेक्षाही "लयभारी', अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारणही तसेच आहे. अमरावतीवरून किंवा इतर जिल्ह्यांतून मुंबई अथवा पुण्याला जाण्यासाठी खासगी टॅक्‍सीचालकांकडून आकारण्यात येणारे प्रवासभाडे विमान प्रवासाच्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मुंबई-पुण्यात अडकलेल्या आपल्या प्रियजनांना घरी आणण्यासाठी गरजू नागरिक हे भाडेसुद्धा नाइलाजाने स्वीकारीत आहेत. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून मुंबई, पुणे ही महानगरे "हॉटस्पॉट' म्हणून ओळखली जात आहेत. मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याने तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच लॉकडाउनमुळे अनेकांचे नातलग मुंबई किंवा पुण्यात अडकले आहेत. शहरातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला आहेत तर अनेकजण खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. हीच परिस्थिती मुंबईचीसुद्धा आहे. मात्र, आता शासनाने आंतरजिल्हा वाहतुकीची परवानगी दिल्याने ई-पास घेऊन दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सध्या मुंबई तसेच पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहनचालकांनी आपले दरसुद्धा वाढविले आहेत. मुंबई किंवा पुण्याला जाऊन परतण्यासाठी 16 ते 18 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामध्ये टोलचे पैसे प्रवाशालाच द्यावे लागतात.

विशेष म्हणजे नागपूर ते मुंबई किंवा नागपूर ते पुणे असा विमानप्रवास जास्तीत जास्त पाच ते सहा हजार रुपयांना होतो. साध्या नॉन एसी कारचे मुंबई किंवा पुण्यापर्यंतचे भाडे 11 ते 12 रुपये प्रतिकिलोमीटर तर एसी वाहनाचे 13 ते 15 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. 9 सीटर तवेराचे नॉनएसीचे 12 ते 13 तसेच एसीचे 14 ते 16 रुपयांपर्यंत भाडे आहे. इनोव्हा या आरामदायक वाहनाचे नॉनएसीचे भाडे 14 ते 15 रुपये प्रतिकिलोमीटरपर्यंत आकारले जाते. भाड्याची ही रक्कम पाहता वाहनाचे भाडे विमानापेक्षाही जास्त असल्याचे समोर आले आहे. भाडे जबरदस्त आकारले जात असले तरी गरजेपोटी अनेकजण ते देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात, मिळालेल्या संधीचा वाहनचालकसुद्धा "सोने' करीत आहेत. 
 

खासगी वाहनांची सर्वत्र मागणी 

शासनाकडून देण्यात येणाऱ्या ई-पासच्या आधारे शहरात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच नागरिक मुंबई किंवा पुण्यावरून दाखल होत आहेत. त्यामुळे स्थानिक खासगी वाहनांची मागणी अचानक वाढली आहे. एक किंवा दोन व्यक्तींसाठी सुद्धा स्पेशल वाहने नेली जात आहेत. विशेष म्हणजे केवळ मुंबई, पुणेच नव्हे तर बिहार व उत्तर प्रदेशातसुद्धा वाहनांना मागणी आहे. 
 

दरवर्षी उन्हाळ्यात किलोमीटरचे प्रवास भाडे वाढविण्यात येते. मुंबई किंवा पुण्याच्या भाड्यात किंचित वाढ करण्यात आल्याचा दावा स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून खासगी वाहनांच्या ट्रीपमध्ये मोठी वाढ झाली. त्यातही मुंबई-पुणे येथून आपल्या नातलगांना आणणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही खासगी वाहनचालक ओळखीचे असल्यास किंवा मानवतेपोटी वाजवी दरातसुद्धा आपली सेवा देत असल्याचे समोर आले आहे. 
 

गरजेपोटी भाडेवाढीचा मुद्दा गौण 

सध्याची वेळ आणीबाणीची आहे. अशा स्थितीत शासनाने आपापल्या नातलगांना आणण्याची परवानगी दिली हेच खूप झाले. आता भाडेवाढीचा मुद्दा असला तरी गरजूंसाठी हा मुद्दा गौण ठरतो, असे एका पालकाने सांगितले. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com