चहा पिणारे अधिक क्रिएटिव्ह

प्रशांत रॉय
शनिवार, 20 एप्रिल 2019

आजघडीला सगळ्यांच्याच दिवसाची सुरवात चहाने होते. चहामुळे तरतरी येते. हा फायदा असल्याचे चहाबाजांचे मत. तर चहामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, एका नवीन संशोधनानुसार चहा पिणारे हे अधिक क्रिएटिव्ह (सर्जनशील) आणि आकर्षक असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

नागपूर - आजघडीला सगळ्यांच्याच दिवसाची सुरवात चहाने होते. चहामुळे तरतरी येते. हा फायदा असल्याचे चहाबाजांचे मत. तर चहामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, एका नवीन संशोधनानुसार चहा पिणारे हे अधिक क्रिएटिव्ह (सर्जनशील) आणि आकर्षक असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

चहाचा आनंद घेत आपल्या दिवसाची सुरवात होते. भारतात दूध आणि साखर टाकून चहा पितात. ब्रिटनमध्ये हाय टी, चीनमध्ये ग्रीन टी, जपानमध्ये माचा टी लोकप्रिय आहेत, तसेच इतर काही देशांत चहाचे वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत. जगभरात पिला जाणारा चहा तितक्‍याच विविधतेने बनविला जातो. चहाची जगभरात लोकप्रियता लक्षात घेता चीनमध्ये याविषयी काही बाबी पडताळून पाहण्यासाठी संशोधन करण्यात आले. राजधानी बीजिंगमधील पेकिंग विद्यापीठात अभ्यासकांनी यासंदर्भात संशोधन केले. या अभ्यासामधील सर्व निष्कर्ष "फूड क्वॉलिटी ऍण्ड प्रेफरन्स जर्नल'मधील एका विशेष लेखामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

चहामध्ये कॅफीन आणि थेनीन हे दोन घटक प्रामुख्याने असतात. या घटकांमुळे चहा पिणारी व्यक्ती दक्ष आणि सजग राहते. चहा प्यायलानंतर डोक्‍यात वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

असा केला प्रयोग
संशोधनात अभ्यासकांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये 50 विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयोग केला. सरासरी 23 वर्ष वयोगट असणाऱ्या या दोन्ही गटांमधील एका गटातील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास दिले आणि दुसऱ्या गटातील मुलांना कोरा चहा प्यायला दिला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना काही ठोकळे देऊन त्यापासून इमारतींची रचना तयार करण्यास तसेच वेगवेगळ्या थीमवर आधारित हॉटेल्ससाठी नावे सुचवण्यास सांगितले. त्यांनी तयार केलेली रचना आणि नावांवरून त्यांच्या डोक्‍यामधील विचारांवरून चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचे विचार हे अधिक क्रिएटिव्ह आणि आकर्षक आहेत, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला.

हिवाळा असो वा उन्हाळा लोकांची चहाच्या दुकानावर नेहमीच गर्दी दिसेल. सकाळ ते सायंकाळ होऊन जाते पण लोक चहा प्यायला येतच असतात. आम्ही चहाची एक क्वॉलिटी सेट केली आहे. यामुळे लोकांना उत्साही वाटतं, तरतरी येते.
- विवेक तुमराम, ललीत टी स्टॉल, रामदास पेठ, नागपूर

दिवसाला पाच कपपेक्षा जास्त प्रमाणात अती उकळलेला चहा पिणाऱ्यांची पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. तसेच आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांचाही सामना करावा लागतो, असे माझे मत आहे.
- गणेश श्रीवास्तव, नागरिक

Web Title: Tea Creative Health