लाज बाजूला सारली अन्‌ चहाटपरी टाकली

प्रमोद मोहतकर
प्रमोद मोहतकर

लाज बाजूला सारली अन्‌ चहाटपरी टाकली
नागपूर : "स्वतःकडे चार एकर शेती आहे. आणखी पाच एकर शेती ठेक्‍याने घेतली. कधी कमी तर कधी जास्त उत्पादन त्यातून मिळत होते. यंदा मात्र पाण्याअभावी कापूस, सोयाबीन हातातून गेलं. पुढचे काही महिने शेतातून काहीही उत्पन्न मिळण्याची शक्‍यता नाही हे लक्षात आलं आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटीसी चहाटपरी टाकली. यातून होणाऱ्या पोटापाण्यापुरत्या कमाईतून रोजचा दिवस कसाबसा काढत आहे', प्रमोद मोहतकर आपल्या वाळत चाललेल्या कपाशीच्या शेताकडे पाहून सांगत होते.
मेटपांजरा येथील प्रमोद हा युवा शेतकरी असून शिक्षितही आहे. शेतीची आवड असल्याने आणि विविध शेतकऱ्यांच्या यशकथा वाचून आपणही काहीतरी वेगळं करावं या ध्येयाने त्याने शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. प्रारंभी दिलासादायक उत्पादन मिळत गेल्याने प्रमोदचा उत्साह वाढला. त्याने आणखी पाच एकर शेती ठेक्‍याने घेतली. गेल्यावर्षी बोंडअळीच्या संकटाने तोंडचा घास हिरावला. मात्र, नाउमेद न होता यंदा पुन्हा नव्या आशेने शेतीकडे लक्ष घातलं. कपाशी आणि सोयाबीनची लागवड केली. प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे उत्पादन समाधानकारक होईल असा अंदाज होता. परंतु, पावसाने पाठ फिरवली आणि कपाशी, सोयाबीन पिकाने मान टाकली. रब्बीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे गहू, हरभरा शक्‍य नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रमोदने चहाटपरी टाकली. यातून होत असलेल्या कमाईतून पाच जणांच्या खर्चाची तो तजवीज करीत आहे.
पैसे कमवायला शहरात जाणार ः वाघडकर
आमच्याकडे शेती नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू घरी 10 ते 12 म्हैशी आणल्या. घरही बांधले. यासाठी डोक्‍यावर मोठे कर्ज झाले. पाऊसपाणी ठीक होते तोपर्यंत सुरळीत चाललं होतं. परंतु, गेल्यावर्षापासून दुग्धव्यवसायाला ग्रहणच लागलं आहे. दुधाला भाव मिळत नाही, जनावरांवर मोठा खर्च होतो आहे. हिरव्या चाऱ्याचीही टंचाई आहे. यामुळे एक एक म्हैस विकायला काढली. यंदा तर परिस्थिती आणखी चिघळल्यामुळे जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. डोक्‍यावरील कर्जाचा भार हलका करण्यासाठी काही जनावरांची विक्री करून शहरात जाणार आहे आणि तेथे मिळेल ते काम करून घरच्यांसाठी पैसा कमवायचा आहे, असे ताराबोडी गावातील पशुपालक छत्रपती वाघडकर यांनी सांगितले.  

शेतीतून यंदा काहीच उत्पन्न मिळणार नाही. हे समजल्यामुळे चहाटपरी टाकायचा विचार केला. प्रारंभी लोक म्हणतील म्हणून लाज वाटत होती. कारण मला प्रगतिशील शेतकरी म्हणून नाव मिळवायचे होते. परंतु, कुटुंबाच्या रोजच्या पोटापाण्याचीही सोय करणे गरजेचे असल्याने शेवटी हिंमत करून या व्यवसायाला सुरुवात केली. पुढच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यास पुन्हा शेती करणार हे मात्र नक्की.
-प्रमोद मोहतकर, युवा शेतकरी, मेटपांजरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com