भाजप सरकारला धडा शिकवावा - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सरकारला जनतेनेच आता धडा शिकवावा, असे आवाहन केले.

अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सरकारला जनतेनेच आता धडा शिकवावा, असे आवाहन केले.

शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गावंडे यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात तटकरे बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार तुकाराम बिडकर आदी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, 'देशात दुसऱ्या हरितक्रांतीनंतर शरद पवार यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले. सर्वसमावेशक धोरण राबवित त्यांनी समाजाच्या उत्थानाचा विचार पेरला. मात्र, सध्या देशात आणि राज्यात जातिवाद पेरून दुफळी माजविण्याचे काम केले जात आहे.''

सन्मानजनक जागा मिळाल्यास आघाडी
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी कॉंग्रेस व समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळायला हव्यात. ज्याची जेवढी ताकद तशा जागावाटप झाल्यास पक्षनेतृत्व आघाडीसाठी पुढाकार घेईल. आम्ही आघाडी करण्याची तयारी दर्शवितो म्हणजे स्वबळावर लढू शकत नाही, तशी शक्ती नाही, असे कुणी समजू नये, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसला लगावला.

शेतकरीविरोधी धोरण राबविणारा पक्ष मी सोडला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील विश्‍वासाने 36 वर्षे शिवसेना घडविण्याचे काम केले. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आले. त्यांच्या अवतीभोवती हुजऱ्यांची फौज आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आणि शेतकऱ्यांचे भले करू शकणारा नेता म्हणून शरद पवार यांच्यावरील विश्‍वासाने राष्ट्रवादी कॉंग्रेसची निवड केली.
- गुलाबराव गावंडे

फोटो ः A14686
अकोला - शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत "राष्ट्रवादी'त मंगळवारी जाहीर प्रवेश केला.

Web Title: Teach a lesson to BJP Government