शिक्षिकेने मुकबधीर विद्यार्थ्यांकडून चेपून घेतले पाय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- शिक्षिकेस पाच वर्षांचा कारावास
- जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
- 2013 मधील घटना
- विद्यार्थ्यांनी केले होते स्टींग

अकोला : शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिका शीतल अवचार हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (ता.13) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.

मलकापूर परिसरात असलेल्या शासकीय मूकबधीर विद्यालयात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने 13 ऑक्टोबर 2013 रोजी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, दोषी शिक्षिका शीतल अवचार ही विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करीत आहेत. याचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांने व्हिडीओसुद्धा काढला होता. काढलेला व्हिडीओ हा पोलिसांकडे देण्यात आला होता.

तक्रार आणि व्हिडीओ क्लीप पाहल्यानंतर खदान पोलिसांनी तेव्हा शीतल अवचार आणि तिचे सहकारी यांच्याविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी चौकशी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश (दुसरे) एच.के.भालेराव यांच्या न्यायालयात बुधावारी झाली.

सरकारी पक्षाकडून न्यायालयामध्ये नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. वकिलांचा युक्तीवाद आणि साक्षीदारांची साक्ष ऐकून न्यायाधीशांनी शीतल अवचार हिला दोषी ठरवत पाच वर्षाचा कारावास व 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून ॲड. राजेश्वर रेलकर यांनी बाजू मांडली.

विद्यार्थ्याचे धाडस कौतुकास्पद
शहरातील शासकीय मुकबधीर विद्यालयात मूकबधीर विद्यार्थ्यांकडून पायाची मालीश करून घेण्याचा घृणास्पद प्रकार या शाळेतील दोषी शिक्षिका शीतल अवचार हिने चालविला होता. हा प्रकार सतत दोन वर्षांपासून अवचारबाई करीत होती. दोषी अवचारबाईंचा हा कारनामा उघड केला त्याच मुकबधीर शाळेतील सातवीतल्या एका मुकबधीर विद्यार्थ्याने. विद्यार्थ्याच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आल्याने दोषी शिक्षिकेस आता पाच वर्षाचा कारावास झाला असून, 30  हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

महिला शिक्षेकवर पोस्कोचा पहिला गुन्हा
शिक्षिका शीतल अवचार ही शाळेती मुकबधीर विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणे, मुलांकडून मालिश करून घेणे, शाळेला दांड्या मारणे, जास्तवेळ मोबाईल बोलत बसणे असले प्रकार करीत होती. त्याविषयी तिला समजही देण्यात आली होती. मात्र, हा प्रकार उघड झाल्यावर या शिक्षिकेला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले होते. याप्रकरणी महिला शिक्षिकेवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यात दोषी ठरल्याचा हा पहिलाच खटला असल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the teacher cheated on the student