शिक्षक निवडणुकीची शाई मधल्या बोटावर महापालिकेत तर्जनीच - विभागीय आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नागपूर - शिक्षक व महापालिकेच्या निवडणुका पाठोपाठ होत असल्याने यंदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांच्या मधल्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. महापालिकेत मात्र नेहमीप्रमाणे तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.

नागपूर - शिक्षक व महापालिकेच्या निवडणुका पाठोपाठ होत असल्याने यंदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांच्या मधल्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. महापालिकेत मात्र नेहमीप्रमाणे तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारीला मतदान, तर 6 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी 124 केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यासाठी 680 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 34 हजार 987 शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. मतदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या जांभळ्या रंगाच्या शाई पेनाचा उपयोग करायचा आहे. इतर पेनाचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे.

मतमोजणी सेंट ऊर्सुला शाळेत होणार आहे. आचारसंहितेदरम्यान विकासकाम, महत्त्वाच्या कामांना मंजुरी दिल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिली. या वेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपायुक्त पापडकर व तहसीलदार श्रीराम मुंदडा उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची बदली नाही
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे मूळचे नागपूरचे आहेत. महापालिकेची निवडणूक घोषित झाल्याने त्यांची बदली करावी, अशी तक्रार करण्यात आली. यावर आयुक्तांनी जिल्हाधिकारी सहायक निर्णय अधिकारी आहेत. महापालिका आयुक्त मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने बदलीचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सांगितले.

"त्या' वक्तव्याने भंग नाही
"विधान परिषदेचे आमदार फंड विकतात', या विधानामुळे आचारसंहितेचा कुठलाही भंग होत नाही. आतापर्यंत आचारसंहितेचा भंग झाल्याची एकही तक्रार आली नसल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Teacher Municipal elections ink middle finger