सहकाऱ्यांच्या जाचामुळे शिक्षकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

महागाव (जि. यवतमाळ) - शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना महागाव तालुक्‍यातील बेलदरी येथे सोमवारी (ता. नऊ) सकाळी उघडकीस आली. पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत कार्यरत या शिक्षकाने मृत्यूपूर्व सात पानाची चिठ्ठी लिहून जाच देणाऱ्या तिघांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मनोहर वसंत जाधव (वय ३७) रा. बेलदरी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी (ता. आठ) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईलवरून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या पत्नीने नातेवाइकांना माहिती दिली. त्यांचा शोध सुरू केला असता रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी आणि त्याचे पाकीट स्वत:च्या शेतातील विहिरीजवळ आढळून आले. विहिरीत पाणी अधिक असल्याने रात्री शोध घेता आला नाही. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. सोमवारी (ता. नऊ) सकाळी विहिरीचे पाणी उपसल्यानंतर मनोहर जाधव यांचा मृतदेह आढळून आला. तसेच विहिरीवर ठेवलेल्या पाकिटात सात पानांची चिठ्ठी मिळाली. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

मृत्यूपूर्व चिठ्ठीत त्यांनी आपल्याला काटखेडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नारायण शेवाळकर, सहायक शिक्षक आश्विन शिवलाल चव्हाण आणि केंद्रांतर्गत मुंगसाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांच्या नावाचा उल्लेख आहे.  या तिघांनी आपला मानसिक छळ केला. मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षक शाळेत शिकवत नव्हते. मुलांना साधी इंग्रजीही येत नाही, याबाबत आपण केंद्रप्रमुखांकडे तक्रार केली. तेव्हापासून आपल्याला मानसिक त्रास सुरू झाला. या दोघांना शिक्षक संघटनेच्या नेत्याने सहकार्य केले. आपले जीवन जगणे कठीण झाले, यामुळेच आपण आत्महत्या करीत असून आपल्या आत्महत्येला केवळ हे तिघेच जबाबदार असल्याचे या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे.  दरम्यान, नातेवाइकांच्या विनंतीवरून विहिरीजवळच सोमवारी दुपारी शवविच्छेदनास सुरुवात  झाली. यावेळी परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. मृत शिक्षकाच्या मागे पत्नी वर्षा, मुलगा, मुलगी आणि आईवडील आहेत.

Web Title: teacher suicide crime