शिक्षक संघटना आणि राजकीय पक्ष आमनेसामने; शिक्षक मतदारसंघातील सामन्यात रंगत

सुरेंद्र चापोरकर 
Friday, 13 November 2020

अर्थात अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी राजकीय पक्ष विरुद्ध शिक्षक संघटना, असा सामना या मतदारसंघात पहिल्यांदाच रंगणार आहे

अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात कोणते उमेदवार शिल्लक राहतात, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार असले तरी पक्ष विरुद्ध शिक्षक संघटना, असे चित्र सध्या रंगविल्या जात आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याचे संकेत आहेत.

महाविकास आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे, भाजपचे डॉ. नितीन धांडे, तर संघटनेच्या माध्यमाने रिंगणात आलेले शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे, लोकभारतीचे दिलीप निंभोरकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळपांडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले, विज्युक्‍टाचे अविनाश बोर्डे यांच्यासह आणखी काही मंडळी विविध संघटनेच्या माध्यमाने या निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

सविस्तर वाचा - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

अर्थात अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी राजकीय पक्ष विरुद्ध शिक्षक संघटना, असा सामना या मतदारसंघात पहिल्यांदाच रंगणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने चाचपणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, तीन संस्थाध्यक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे तीन पक्षांना एकत्र घेऊन एक उमेदवार रिंगणात आहे. 

यासोबतच तीन संघटनांच्या जोरावरदेखील एक उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक सर्वच अर्थाने वेगळी असल्याचे मानले जाते. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत आजवर शिक्षकांच्या संघटनाच सक्रिय राहत होत्या. त्यांचेच उमेदवार रिंगणात उतरत होते. परंतु पहिल्यांदाच राजकीय पक्ष रिंगणात आल्याने या वेळी काय चित्र राहील याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिक्षक नव्यांना संधी देतात की त्यांच्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून लढा उभारणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतात याबाबतची उत्सुकता आता ताणल्या गेली आहे.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

छाननीत २८ उमेदवारांचे अर्ज वैध

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २८ उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली. या छाननीवेळी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये उपस्थित होते. छाननीनंतर श्रीकांत देशपांडे, चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर, डॉ. नितीन धांडे, प्रा. अनिल काळे, संगीता शिंदे-बोंडे, दिलीप निंभोरकर, अभिजित देशमुख, प्रा. अरविंद तट्टे, अविनाश बोर्डे, आलम तन्वीर सैय्यद नियाज अली, उपेंद्र पाटील, प्रकाश काळपांडे, सतीश काळे, किरण सरनाईक, नीलेश गावंडे, महेश डवरे, दिपंकर तेलगोटे, प्रवीण ऊर्फ पांडुरंग विधळे, राजकुमार बोनकिले, डॉ. मुश्‍ताक अहेमद रहेमान शाह, मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी, प्रा. विनोद मेश्राम, शरदचंद्र हिंगे, श्रीकृष्ण ठाकरे, विकास सावरकर, सुनील पवार, सय्यद रिझवान सय्यद फिरोज, संजय आसोले हे 28 उमेदवार राहणार आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teachers association and political parties opposite to each other in election