पदवीधरमध्ये शिक्षक संघटना करणार घुसखोरी

पदवीधरमध्ये शिक्षक संघटना करणार घुसखोरी

नागपूर : शिक्षक संघटनांना आता पदवीधर मतदारसंघसुद्धा खुणाऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदान नोंदणीचा पहिला टप्पा बुधवारी (ता. 6) पार पडला असून यंदा प्रथमच मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यावरून शिक्षक संघटना आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 
विधान परिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांसाठी मतदारसंघ आरक्षित करण्यात आले आहे. अडीच वर्षांपूर्वीच राज्यातील सहा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. साधारणत: तीन वर्षांच्या अंतराने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यात येतात. त्यानुसार जून महिन्यात नागपूरसह, पुणे मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. गेल्या दोन निवडणुकांपासून पदवीधर निवडणुकांमध्ये कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच निवडणूक लढविण्यात येते. यापूर्वी शिक्षक संघटनांना पक्षांचे समर्थन देत निवडणुका लढविण्यात येत होत्या. मात्र, अमरावती पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्या परावभानंतर संघटनांचे अस्तित्व मोडकळीस निघाले. तेव्हापासून अमरावतीमध्येही कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढत बघायला मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून सातत्याने चारदा निवडून गेलेत. त्यानंतरही त्यांच्यानंतर प्रा. अनिल सोले यांनी गेल्यावेळी निवडून येत मतदारसंघावर पकड कायम ठेवली. आता जून महिन्यात मतदारसंघाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणी संपली. मात्र, यावेळी शिक्षक संघटनांनी पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी शिक्षक निवडणुकांमध्ये चार वेळा आपला आमदार देणाऱ्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा समावेश आहे. दुसरीकडे गेल्यावेळी शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहून चुरशीची लढत दिलेल्या आमदार कपिल पाटील यांच्या "शिक्षक भारती' या शिक्षक संघटनेनेही कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा नागपूर पदवीधर मतदारसंघातील सामना रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय शिक्षक संघटनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना (नुटा) सरसावली आहे. त्यामुळे यावेळी प्रथमच बहुरंगी लढत बघायला मिळणार असल्याची शक्‍यता आहे. 
शिक्षकांचे नेटवर्क ठरणार फायदेशीर 
नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. सहाही जिल्ह्यांत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती आणि नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटनेचे (नुटा) चांगले नेटवर्क आहे. गेल्या निवडणुकांमध्ये या संघटना जवळपास डॉ. बबनराव तायवाडे यांच्या समर्थनार्थ काम करीत होत्या. मात्र, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने चंद्रपूरचे अनिल शिंदे यांच्या रूपाने उमेदवार दिल्याने यंदा शिक्षक संघटना याचा बदला म्हणून पदवीधर मतदारसंघात हस्तक्षेप करीत असल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com