शिक्षकांमध्ये गाणारच ठरले 'सर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

नागपूर - शिक्षक आमदारासाठी झालेली अटीतटीची लढत अखेर भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार आमदार नागोराव गाणार यांनी सर केली. पहिल्या पसंतीचा कोटा कोणीच पूर्ण केला नाही. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी मध्यरात्रीपर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र, गाणार यांनी पहिल्या पसंतीच्या मताची मोठी आघाडी घेतल्याने इतर उमेदवारांना ती मोडून काढता आली नाही.

नागपूर - शिक्षक आमदारासाठी झालेली अटीतटीची लढत अखेर भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार आमदार नागोराव गाणार यांनी सर केली. पहिल्या पसंतीचा कोटा कोणीच पूर्ण केला नाही. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी मध्यरात्रीपर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र, गाणार यांनी पहिल्या पसंतीच्या मताची मोठी आघाडी घेतल्याने इतर उमेदवारांना ती मोडून काढता आली नाही.

मतमोजणीस मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून प्रारंभ झाला. पहिल्या पसंतीने विजयासाठी 13 हजार 860 मतांचा कोटा निश्‍चित झाला. गाणार यांनी पहिल्या पसंतीची 10 हजार 32 तर प्रतिस्पर्धी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना 5276, आनंदराव कारेमोरे 4490, कॉंग्रेस समर्थित अनिल शिंदे 2099 तसेच शिवसेनेचे प्रकाश जाधव यांना 599 मते मिळाली. गाणार यांनी पाच हजार मतांची आघाडी घेतल्यानंतरही त्यांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी मोजणी सुरू झाली. येथूनच निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र, इतर उमेदवारांच्या तुलनेत गाणार यांना 5 हजारांवर मतांची आघाडी होती. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचे पहिल्या चार उमेदवारांमध्ये विभाजन होत गेले. यामुळे निकाल गाणारांच्या बाजूने झुकत गेला. शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या पसंतीची आकडेवाडी जाहीर होताच जल्लोष सुरू केला होता.

शिक्षक मतदारसंघात परिषदेला भाजपने समर्थन जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसने अनिल शिंदे तर शिवसेनेने माजी खासदार प्रकाश जाधव यांना मैदानात उतरविले. प्रत्यक्षात कॉंग्रेस आणि शिवसेनेचा भाजपसमोर निभावच लागला नसल्याचे चित्र दिसून आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार 5 हजार 301 मतासह आनंदराव कारेमोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कॉंग्रेसचे अनिल शिंदे 3 हजार 91 मतांसह चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. नागोराव गाणार यांच्या प्रचाराचे नारळ मुख्यमंत्र्यांनी फोडले तर खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गाणारांची प्रचारसभा घेत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गाणार यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. त्यानुसार मतमोजणीतही कल दिसून आला. पहिल्या फेरीत गाणारांना 2 हजार 473 मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत ती 4 हजार 480 ठरली. मात्र, मतमोजणीनंतर निश्‍चित केलेला 13 हजार 860 मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करीत नसल्याने दुसऱ्या पसंतीक्रमानुसार मतमोजणी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गाणारांना 12 हजारावर मते, प्रा. राजेंद्र झाडे यांना सात हजारांवर मते पडली. दरम्यान एकही उमेदवार 13 हजार 860 मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्याने नागोराव गाणार यांना विजयी घोषित करण्यात आले.

शिक्षकांच्या विश्‍वास सार्थ ठरविणार : गाणार
सहा वर्षात जी कामे केली, त्या कामावरच शिक्षकांनी विश्‍वास दर्शवीत विजयी केले. त्यांचे आभार आहे. हा विश्‍वास येत्या सहा वर्षात सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नागोराव गाणार यांनी दिली. भाजप आणि इतर संघटनांनी दिलेल्या समर्थनामुळे हे शक्‍य झाले. मात्र, शिक्षकांच्या प्रश्‍नासाठीच नेहमी लढा देणार असल्याचे ते म्हणाले. बंडखोराबाबत संघटना निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूण मतदान : 29 हजार 178, नोटा : 48, अवैध मते : 1 हजार 412, आवश्‍यक कोटा : 13 हजार 860.
नागोराव गाणार : ....
प्रा.राजेंद्र झाडे : ....
आनंदराव कारेमोरे : 5 हजार 301
अनिल शिंदे : 3 हजार 91

Web Title: Teachers election; Ganor won