Teacher's Day 2019 : शिक्षकदिनावर संघटनांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अशा आहेत मागण्या 

  • जुन्या पेन्शन योजना लागू करणे
  • वेतनेतर अनुदान लवकरात लवकर देणे, 
  • आयडी नोंदणीतील दिरंगाई थांबविणे
  • शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करणे.
  • खासगीकरण रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे
  • केंद्र कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मिळणे.
  • विद्यार्थीसंख्या कमी झाल्यावरही शिक्षक व शिक्षकेतर पद कमी करू नये

शिक्षकदिन 2019 : नागपूर - शिक्षक आणि शाळांच्या गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीसह विविध शिक्षक संघटनांनी उद्या ‘शिक्षकदिन’ काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून सरकारचा बहिष्कार करण्याचे ठरविले आहे.  

वेतनेतर अनुदानासह, निवड वेतनश्रेणी न मिळणे, रात्रशाळांच्या शिक्षकांचा प्रश्‍न, शालार्थ आयडी नोंदविण्यात होणारी दिरंगाई, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचा समायोजनाची प्रक्रिया आणि इतर अनेक मागण्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून जवळपास सर्वच शिक्षक संघटना आंदोलन करीत आहेत. यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदने सादर करण्यात आली. या निवेदनांवर राज्य सरकारकडून केवळ आश्‍वासनाची खैरात मिळाली.

याउपर मुंबई येथील आंदोलनादरम्यान, विनाअनुदानित शिक्षकांवर लाठीमार करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. या सर्व बाबींमुळे हे सरकार शिक्षक व शाळाविरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या सरकारविरोधात बहिष्काराचे अस्त्र उगारल्याशिवाय पर्याय नसल्यानेच उद्याचा दिवस काळा दिवस म्हणून संघटनांकडून पाळण्यात येईल. 

केवळ शिक्षकच नव्हे, तर या बहिष्कारात नोव्हेंबर २००५ चा जुन्या पेन्शनचा अध्यादेश रद्द करणे आदी मुद्दे उपस्थित करून राज्यातील विविध शिक्षकेतर कर्मचारी संघटना यात सहभागी होणार आहे. कर्मचारी संघटनांकडून सरकारविरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

आंदोलनात नागपूर जिल्हा शिक्षण समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना यांच्यासह इतर अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Organisation Boycott on Teachers Day Black Day