बीएलओचे काम करण्यास शिक्षकांचा नकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

हिंगणा (जि.नागपूर) : मतदारयादी पुनरिक्षण व मतदार पळताळणी कार्यक्रमासाठी बीएलओ म्हणून केलेल्या नियुक्‍त्या रद्द कराव्या, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (ता.20) तहसील कार्यालयात उपस्थित तालुक्‍यातील सुमारे तिनशे शिक्षकांनी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार संतोष खांडरे यांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते स्वीकारले नाही.

हिंगणा (जि.नागपूर) : मतदारयादी पुनरिक्षण व मतदार पळताळणी कार्यक्रमासाठी बीएलओ म्हणून केलेल्या नियुक्‍त्या रद्द कराव्या, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (ता.20) तहसील कार्यालयात उपस्थित तालुक्‍यातील सुमारे तिनशे शिक्षकांनी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार संतोष खांडरे यांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते स्वीकारले नाही.
शुक्रवारी यासंबंधी आयोजित साहित्य वितरण व प्रशिक्षण शिबिरातदेखील हे शिक्षक तहसील कार्यालयात पोहचूनही अनुपस्थित राहिले. 17 सप्टेंबरला हिंगणा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद तसेच खासगी शाळेतील शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्तीचे पत्र दिले होते. तसेच साहित्य वितरण व प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहण्यासंबंधी माहिती दिली होती.शुक्रवारी सर्व शिक्षक तहसील कार्यालयात पोहचले, मात्र प्रशिक्षण वर्गात न जाता त्यांनी हा नियुक्ती आदेश रद्द करण्याचे निवेदन दिले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार याआधी मतदार नोंदणी व पळताळणी कामात आलेल्या अनुभवानुसार बीएलओचा कालावधी पुन्हा वाढविण्यात येतो. हा काळ शालेय अध्यापन, पटनोंदनी व शैक्षणिक कार्य करण्याचा महत्वाचा काळ असतो. त्यामुळे ही मोहीम राबविणे त्यांना अशक्‍य आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क 2009 व गुणवत्तापूर्ण शिक्षण याचा विचार करून हे अशैक्षणिक कार्य त्यांच्याकडून न करविता इतर बीएलओ अंगणवाडीसेविका, तलाठी, आमीन, लेखपाल, ग्रामसेवक, ग्रामस्तरीय, कार्यकर्ता, पोस्टमन, आशावर्कर, आरोग्यसेवक यांच्याकडून करावी, असे निवेदन सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार संतोष खांडरे यांनी स्वीकारले नाही.
कारवाई होणार
तहसील कार्यालयात आयोजित बीएलओंना साहित्य वितरण व प्रशिक्षण शिबिरात सहभागी न होणाऱ्या सर्व शिक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरी शिक्षकांनी हे निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला तर एफआयआर दाखल करण्यात येईल. त्यांचे निवेदनही स्वीकारण्यात आले नाही, असे तहसीलदार संतोष खांडरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers refuse to work for BLO