शिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता

बुधवार, 22 ऑगस्ट 2018

शिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता
नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास बंदी घातल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना साफसफाईसह प्रसाधनगृहांची स्वच्छता करावी लागत आहे.

शिक्षक, विद्यार्थी करतात शाळा, टॉयलेटची स्वच्छता
नागपूर : सुमारे 12 वर्षांपासून सर्वच शासकीय शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास बंदी घातल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना साफसफाईसह प्रसाधनगृहांची स्वच्छता करावी लागत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेतील शाळांमध्ये सातत्याने पटसंख्या घसरत चालली आहे. राज्यात 90 हजार प्राथमिक व 40 हजारांवर माध्यमिक शाळा आहेत. यापैकी प्राथमिक शाळांमध्ये सरकारकडून चतुर्थश्रेणी पदच दिलेले नाही. माध्यमिक शाळांमध्ये 150 पेक्षा कमी पटसंख्या असल्यास लिपिक आणि सफाई कर्मचाऱ्यांची असलेली पदे व्यपगत करण्यात येतात. त्यामुळे ज्या शाळांची पटसंख्या 150 पेक्षा अधिक आहे, त्या शाळांमध्ये लिपिक आणि सफाई कामगार ही चतुर्थश्रेणीची पदेही रिक्तच आहेत.
शाळेमधील दैनंदिन कामाची सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छता व आठवड्यात दर दोन दिवसांनी टॉयलेटची स्वच्छता करणे गरजेचे असते. जिथे पदच नाही, त्या शाळांमधील शिक्षक पैसे गोळा करून स्वच्छतेसाठी ग्रामपंचातयमधील सफाई कामगाराला पैसे देतात. ज्या शिक्षकांना ते परवडण्यासारखे नसते त्यांना स्वतः झाडू घ्यावा लागतो. काही शिक्षक विद्यार्थ्यांकडून वर्गखोल्या आणि टॉयलेटची सफाई करून घेतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधीचा अडसर
राज्य सरकारकडून शाळांमधील साहित्य व स्वच्छतेसाठी कुठलाही निधी उपलब्ध करून दिला जात नाही. संबंधित जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेने निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, स्वच्छतेची जबाबदारी कोणीच घेत नाही. निधीही देत नाहीत.
12 हजारांवर पदे रिक्त
12 वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये चतुर्थश्रेणी पदांची भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत जवळपास 12 हजारांवर लिपिक पदे रिक्‍त आहे. शिवाय शिपाई, सफाई कामगार ही पदेच संपविल्याचे दिसून येते.
नाल्याही साफ कराव्या लागतात
ग्रामपंचायतीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलवितो. मात्र, ते कधी येतात तर कधी नाही. त्यामुळे वर्गखोल्यांतील जाळे तसेच नाल्याही आम्हालाच साफ कराव्या लागतात, असे शिक्षिकेने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: Teachers, Students do Toilet Cleanliness