लॉकडाउनचा असाही फायदा; चोरीच्या सागवानाची दुप्पट भावात विक्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

लॉकडाउनच्या काळात गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी वनविभागाने टाकलेल्या धाडीत लाखो रुपये किमतीच्या सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. कोरोनामुळे सध्या जंगलात वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे कामे सुरू नसल्याने याचा फायदा तस्कर घेत आहेत. तसेच तस्कर छत्तीसगड, तेलंगणा सीमावर्ती भागात सागवानाची दुप्पट भावात विक्री करीत आहेत.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : लॉकडाउनचा फायदा घेत सागवान तस्कर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने जंगलातील गस्त वाढवली असून ग्रामीण भागात वन व्यवस्थापन समितीच्या महिलाही सतर्क झाल्या आहेत.

आलापल्ली, भामरागड व सिरोंचा या वन विभागांतर्गत सागवान तस्कर सक्रिय झाले आहेत. लगतच्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यात येथील सागवानाला मोठी मागणी आहे. सिरोंचा तसेच लगतच्या तालुक्‍यात मौल्यवान सागवान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

तस्कर घेत आहेत संधीचा फायदा

तस्करीसाठी नदीचा मार्ग सोईस्कर असल्याने स्थानिकांच्या मदतीने सागवान तस्करी केली जाते. लॉकडाउनच्या काळात गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी वनविभागाने टाकलेल्या धाडीत लाखो रुपये किमतीच्या सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. कोरोनामुळे सध्या जंगलात वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे कामे सुरू नसल्याने याचा फायदा तस्कर घेत आहेत.

जाणून घ्या : कोरोनाने केले या व्यवसायालाही `फ्लॅट`; आणले बड्याबड्यांच्या डोळ्यांत पाणी

शिकारीचे साहित्य व 29 सायकली जप्त

दोन दिवसांपूर्वी आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक 71 मध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे मांस, शिकारीचे साहित्य व 29 सायकली जप्त करण्यात आल्या. वनविभागाचे पथक नियमित गस्तीवर असताना आलापल्लीजवळ असलेल्या एका नाल्याच्या परिसरात वन्यजीवाचे मांस आढळून आले. उपविभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे, आरएफओ मनोज चव्हाण, गणेश लांडगे, विनोद शिंदे, शंकर गुरनुले, अनिल झाडे, आर. एस. देवकर्ते, दामोधर चिव्हाणे, एल. एस. येलचिपुरवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकारी एकत्र येऊन वन्यप्राण्यांच्या शिकार करण्यात आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

वनकर्मचारी दिवसरात्र गस्तीवर
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिक आपापल्या सुरक्षेसाठी काळजी घेत घरातच राहात आहेत. मात्र, जंगल व वन्यप्राण्याच्या सुरक्षेसाठी वनकर्मचारी दिवसरात्र गस्तीवर असतात. यामुळे तस्कर व शिकाऱ्यांना फारशी संधी मिळत नाही. सध्या जंगलात आगी लावण्याचे प्रकार सुरू असल्याने कर्मचारी सतर्क राहून यावर नियंत्रण ठेवत आहेत.
- सुमित कुमार, उपवनसंरक्षक, सिरोंचा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teak smuggling increased in lockdown at gadchiroli