तंत्रज्ञान, माहितीने भारावले अर्थमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले.

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले.

मानकापूर येथील क्रीडासंकुल परिसरात आयोजित या परिषदेत देशभरासह विदेशातील रस्ते बांधणीतील हजारो इंजिनिअर सहभागी झाले होते. तांत्रिक प्रदर्शन हे परिषदेचे मुख्य आकर्षण होते. अधिवेशनात ११ तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या सुमारास मुनगंटीवार यांनी तांत्रिक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशींसह इतरही इतर पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवणाऱ्या एका कंपनीच्या स्टॉलला मुनगंटीवार यांनी भेट दिली. दरम्यान, त्यांनी सायकलवर बसून चालवण्याचा आनंद लुटला.

आयोजनाचा हेतू सफल - देबडवार
सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिवेशन आयोजनाची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही उत्कृष्ट आयोजनाच्या तयारीला लागलो होतो. चारदिवसीय अधिवेशनातून सर्वोत्तम आणि सुरक्षित रस्ते विकासाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. कोड्‌स तयार झाले. त्यात सुधारणा करण्यात आल्या, असे मुख्य अभियंता आणि आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार यांनी सांगितले. 

नवीन कार्यकारिणी जाहीर
भारतीय रस्ते काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी अरुणाचल प्रदेशमधील बांधकाम विभागाचे अधिकारी टोली बसर यांची निवड करण्यात आली. आयआरसी महामार्ग बनवण्याचे नियम व निकष ठरवणारी देशातील मोठी संस्था आहे. ही संस्था नियम व निकष तयार करते. परंतु, त्याच्या अंमलबजावणीबाबत सध्यातरी काही यंत्रणा नाही. तेव्हा या नियम व निकषाची अंमलबजावणीही व्हावी, त्यासाठी चर्चा करून एक स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे टोली बसर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technology Information Sudhir Mungantiwar