esakal | सुरक्षारक्षक पुरवत नाही तोपर्यंत अवैध गौणखनिज प्रतिबंधाची कामे बंद, तहसीलदारांचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

tehsildar demand for guard while action against sand smuggler in yavatmal

उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी (ता. 23) वाळूमाफियांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले.

सुरक्षारक्षक पुरवत नाही तोपर्यंत अवैध गौणखनिज प्रतिबंधाची कामे बंद, तहसीलदारांचा निर्णय

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जोपर्यंत सुरक्षारक्षक पुरविले जात नाहीत, तोपर्यंत अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनन याला प्रतिबंध करण्याची सर्व कामे बंद करण्यात येत असल्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा - मुलीची काळजी असणाऱ्या कुटुंबात तुझा पुनर्जन्म व्हावा, गौतम यांचा आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष...

उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर शनिवारी (ता. 23) वाळूमाफियांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची आहे. यासाठी सोमवारी  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेत निवेदन दिले. वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार पवार व तलाठी सुरोशे कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर वाळूमाफिया तसेच कुख्यात गुंड अविनाश चव्हाण यांनी चाकूने पोटावर सपासप वार केले. यात नायब तहसीलदार वैभव पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे उपचाराचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी संघटनेची आहे. या हल्ल्यातील हल्लेखोर अविनाश चव्हाण, त्यांचे सर्व साथीदार, वाहनाचे मालक, ड्रायव्हर या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार संघटनेची आहे. जिल्ह्यात वाळूमाफियाकडून वारंवार महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहे. अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खननाला प्रतिबंध करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणतेही संरक्षण नाही. यापूर्वी सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली होती. मात्र, अजूनही सुरक्षारक्षक पुरविण्यात आले नाही. निवेदन देतेवेळी अध्यक्ष कुणाल झाल्टे, आनंद देऊळगावकर, दिलीप राठोड, एकनाथ बिजवे, अजय गौरकर, पी. झेड. भोसले, राजेश चिंचोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

...अन्यथा बुधवारपासून कामबंद -
नायब तहसीलदारावर हल्ला करणाऱ्या आरोपींना 26 जानेवारीपर्यंत अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. आरोपींना अटक करून कारवाई न केल्यास आजपासून जिल्ह्यात कामबंद करण्याचा इशारा तहसीलदार संघटनेने दिला आहे.
 

loading image