उदासीनतेच्या वाळवीने पोखरले तेलंगखेडी उद्यान

तेलंगखेडी : उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याची क्षमता असलेल्या कारंजाची दुरवस्था.
तेलंगखेडी : उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याची क्षमता असलेल्या कारंजाची दुरवस्था.

नागपूर : तरुण-तरुणींच्या अश्‍लील चाळ्यांमुळे नागपूरकरांनी कधी काळी बहिष्कार टाकलेल्या तेलंगखेडी उद्यानाला आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून येथे प्रेमीयुगुलाला बंदी घातल्याने अधिकाऱ्यांच्या खिशात जाणाऱ्या मोठ्या कमाईला फटका बसला आहे. सध्या कुटुंबांनाच येथे प्रवेश असला तरी त्यांच्यासाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या नियतीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेल्या या उद्यानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. 238 वर्षे जुने हे उद्यान नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, गेल्या दीड दशकात तरुण-तरुणीच्या अश्‍लील चाळ्यांनीच हे उद्यान बदनाम झाले होते. तत्कालीन कंत्राटदार तरुण-तरुणींकडून अधिक पैसे घेऊन जागा उपलब्ध करून देत. त्यामुळे येथे कुटुंबीयासह येण्याची इच्छाही असूनही अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत या उद्यानातील तरुण-तरुणीचे चाळे बंद करण्यात आले. किंबहुना त्यांना प्रवेशबंदीच करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना कुटुंबीयांसह येथे भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या दोन वर्षांत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही येथे पार पडले. मात्र, या उद्यानात बसण्यासाठी बाक, फिरण्यासाठी पाथवे या साध्या सुविधाही नसल्याने एकदा आलेले पर्यटक दुसऱ्यांदा फिरकत नसल्याचे दिसून येते. याबाबत पीडीकेव्हीच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पारलवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथे नवीन खेळणी लावण्यात येत असून कारंजे आदी दुरुस्तीची कामेही प्रस्तावित असल्याचे नमूद केले.
चिमुकल्यांचे खेळणे जमिनीवर आडवे
आठ एकरांच्या या उद्यानाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आहे. येथे चिमुकल्यांसाठी खेळणी लावण्यात आली. मात्र, यातील काही खेळणी जमिनीवर आडवी पडली आहेत. खेळण्याच्या ठिकाणी मोठे गवत उगवले असून त्यांच्या जीविताला धोका नाकारता येत नाही.
देखभाल नाही, दुरुस्तीही नाही
उद्यानात प्रवेश करताच कारंजे दिसून येतात. मात्र, या कारंज्यांची अनेक वर्षांपासून देखभाल नसल्याचे चित्र आहे. येथील कारंजे रंगीत रोषणाईने आकर्षक होते. मात्र, रंगीत विद्युत दिवे चोरीला गेले तर अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असून त्याबाबतही प्रशासन गंभीर नसल्याचे येथील एका सुरक्षारक्षकाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com