सांगा! ठाणेगाव-वैरागड मार्गाची दुरुस्ती करणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

आरमोरी (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून 4 ते 5 किमी अंतरावर असलेल्या ठाणेगाव नवीन येथून सुरू होणाऱ्या ठाणेगाव ते कोरची या राष्ट्रीय महामार्गाची नवीन ठाणेगावजवळील रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था झाली असून हा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणार कधी, असा प्रश्‍न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

आरमोरी (गडचिरोली) : यावर्षीच्या उन्हाळ्यात या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. तसेच रस्त्यावर टाकून असलेले दोन ठिकाणचे जुने सिमेंट पाइप काढून नवीन पाइप टाकण्यात आले. डांबरीकरणाचे व सिमेंट पाइप टाकण्याचे काम एकाच वेळेच करण्यात आले. ज्या ठिकाणी सिमेंट पाइप टाकायचे होते ती जागा सोडून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, पाइप टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणचे डांबरीकरण न करता त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आले. या मार्गावर वाहनांची वर्दळ असल्याने टाकलेले मुरूम निघून गेल्याने त्या ठिकाणी खड्डे पडून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
अजूनही अवकाळी पाऊस येत आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने एखाद्यावेळी नवीन वाहनचालक किंवा रात्रीच्या वेळेस त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन खड्ड्यात पडून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यापूर्वी बरेच ठिकाणी किरकोळ अपघात होऊन अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच संबंधित विभाग रस्त्याची दुरुस्ती करेल काय, असा सवाल नागरिकांतून केल्या जात आहे. या समस्येने येथील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले असून ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
अवजड वाहनांची वर्दळ
ठाणेगाव-कोरची हा राष्ट्रीय मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात टाकलेला मुरूम निघून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. येत्या काही दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास हा मार्ग बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कमलीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाचे व लोकप्रतिनिधींचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले. परंतु, त्यांचे याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन ठाणेगाव-वैरागड मार्गवरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tell me, When will Thanegaon-Vairagad road be repaired?